नवी दिल्ली – सदाबहार भूमिका करून भारतातील चित्रपटरसिकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री जुही चावला हिच्या एका वेगळ्या भूमिकेवर न्यायालयाने मात्र नाराजी व्यक्त केली आहे. ही भूमिका अर्थातच अभिनयाची नसून व्यवहारातील आहे. 5G प्रकरणात जुही चावला आणि इतर अर्जदारांच्या व्यवहारावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले आहे.
दिल्ली उच्च न्यायालयात न्या. जे.आर. मिधा यांच्या खंडपिठासमक्ष या प्रकरणावर सुनावणी होती. अत्यंत नम्रपणे दंडाची रक्कम भरण्यासाठीही आपण लोक तयार नाहीत, याचे आश्चर्य वाटते, असे न्यायाधीश म्हणाले. जुही आणि इतर लोकांवर 20 लाख रुपयांचा दंड लावताना अवमानना कारवाई न करण्याचा पवित्रा न्यायालयाने घेतला होता, हे आपण विसरलात, याचीही न्यायालयाने आठवण करून दिली.
5G प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या जुही चावलावर 20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. यासोबतच न्यायालयाने कठोर शब्दांत ताशेरेही ओढले होते. जुहीची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील मीत मल्होत्रा उपस्थित झाले त्यावेळी न्यायालयाने त्यांच्या व्यवहाराबाबत आश्चर्य व्यक्त केले.
मल्होत्रा यांनी अर्ज परत घेताना दंडाची रक्कम एक आठवड्यात भरण्यात येईल किंवा कायद्याचा आधार घेतला जाईल, असे न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालय भडकले. एकीकडे निरर्थक अर्ज दाखल करायचा आणि दुसरीकडे दंडही भरायचा नाही. तुम्ही म्हणता की न्यायालयाला दंड लावण्याचा अधिकार नाही, पण न्यायालयाकडे अवमानना नोटीस जारी करण्याचा अधिकार आहे, असे न्यायालयाने बजावले. त्याचवेळी जुहीच्या दुसऱ्या वकिलांनी कोर्ट फी भरल्याची माहिती न्यायालयात दिली.