इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दिवसेंदिवस फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहेत. यातून सेलिब्रिटी देखील सुटलेले दिसत नाहीत. अभिनेता महेश ठाकूर याला देखील नुकताच असाच एक झटका बसला. त्यांची तब्बल साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. ओशिवरा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अभिनेता महेश ठाकूर यांच्या मालमत्तेवरून सुरू असलेल्या वादाचा फायदा घेत त्यांना हा गंडा घालण्यात आला आहे. या न्यायालयीन प्रक्रियेबाबत खोटी माहिती देऊन सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील कामकाजाची चित्रफीत तयार करून आरोपी मयांक गोयल याने ठाकूर यांची फसवणूक केली. ऑगस्ट २०२१ पासून आरोपी मयांक गोयल हा ठाकूर यांच्या संपर्कात होता. त्याने ठाकूर यांचा विश्वास संपादन केला.
ठाकूर यांच्या मालमत्तेवरून सुरू असलेल्या वादाचा फायदा घेत उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केल्याचे त्यांना खोटेच सांगितले. त्यानंतर मालमत्तेसंदर्भात शासकीय कार्यालयात, खासगी कार्यालयात पुरावे गोळा करण्यासाठी पैसे खर्च झाले, असे ठाकूर यांना सांगत ओळखीच्या इतर लोकांच्या बँक खात्यात ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात पाच कोटी ४३ लाख रुपये जमा केले. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयातील कामकाजाची चित्रफीत तयार करून गोयल याने ठाकूर यांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ठाकूर यांनी तातडीने ओशिवरा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदवली.
Actor Mahesh Thakur 5 Crore Cheating
Crime Mumbai Bollywood