इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – १३ सप्टेंबर २००४ रोजी महाराष्ट्रातल्या घराघरात ‘पदारावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढूनी खेळ खेळूया नवा’ हे गाणं वाजायला लागलं. महाराष्ट्राच्या महिला वर्गात तुफान लोकप्रिय झालेला ‘होम मिनिस्टर’ या रिऍलिटी शोला तब्बल अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्रात घराघरात पोहोचलेले आदेश भाऊजी यांमुळे हा केवळ कार्यक्रम राहिला नसून या कार्यक्रमाशी सर्वांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळेच कार्यक्रमाला १८ वर्षे पूर्ण झाल्याने आदेश बांदेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘झी मराठी’ने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत आदेश बांदेकरांसोबतच ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमातील पडद्यामागचे कलाकार सहभागी झाले. यावेळी आदेश बांदेकरांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. बांदेकर म्हणाले, “आमच्या सर्वांच्या आयुष्यातील हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. १३ सप्टेंबर २००४ हा दिवस कधी इतका मोठा इतिहास घडवेल असं वाटलं नव्हतं. फक्त १३ दिवसांसाठी सुरू झालेला हा कार्यक्रम आणि आज १३ सप्टेंबर २०२२ ला त्याला १८ वर्ष पूर्ण होत आहेत.”
ते पुढे म्हणाले की “मी भाग्यवान आहे. महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन ही आनंदयात्रा आणि या आनंदयात्रेच्या पालखीचा भोई होण्याचं भाग्य मला लाभलं. जी स्वप्न पाहिली होती, ती सगळी पूर्ण झाली. या कार्यक्रमानं वेगळा आशीर्वाद दिला. हे मायबाप प्रेक्षकांचं प्रेम आहे आणि अर्थात माझ्याबरोबर असणाऱ्या असंख्य पडद्यामागचे कलाकार यांचे आभार. ‘झी मराठी’चे खूप खूप धन्यवाद. जगाच्या नकाशावर रोज एका कुटुंबाला बोलतं करणारा आणि इतकी वर्ष चालणारा एकही कार्यक्रम नाही”, असे आदेश बांदेकर म्हणाले.
होम मिनिस्टर कार्यक्रमाने १८ वर्ष पूर्ण केली या प्रवासात साथ देणाऱ्या सर्व माणसांसोबत साजरा केला गेला हा सुवर्णक्षण.
#zeemarathi #homeminister #aadeshbandekar #18years@aadeshbandekar pic.twitter.com/YRr34akHzd— Zee Marathi (@zeemarathi) September 15, 2022
यावेळी त्यांनी ‘झी मराठी’चे देखील आभार मानले. तसेच त्यांच्या बरोबर पडद्यामागची टीम होती. यावेळी आदेश बांदेकरांनी ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमात पडद्यामागे १८ वर्षांपासून काम करणारे स्पॉट बॉय मिथिलेश यांच्या हातून केक कापला. बांदेकर या टीमचं कौतुक करत म्हणाले की, “कोरोना काळात कार्यक्रम बंद होता, तरीही ही टीम इथेच राहिली. दुसरीकडे गेली नाही.” १८ वर्षांपासून ‘होम मिनिस्टर’ हा लोकप्रिय कार्यक्रम प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे.
होम मिनिस्टर ते ‘महा मिनिस्टर’ पर्यंत या कार्यक्रमाने मजल मारली. तर ‘महा मिनिस्टर’ पर्वाची विशेष चर्चा रंगली. या नवीन पर्वाच्या विजेतीला ११ लाखांची पैठणी मिळणार असल्याने हे पर्व फार गाजले. सोन्याची जर आणि हिरे जडलेल्या या पैठणीची चर्चा सगळीकडे सुरू आहे. राज्याच्या जिल्ह्या-जिल्ह्यात या शोचे खेळ रंगले होते. त्यामुळे हे पर्व घराघरात लोकप्रिय ठरले.
Home Minister Show Aadesh Bandekar
Zee Marathi TV Entertainment