नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १ ऑक्टोबर २०२२ नंतर उत्पादित केलेल्या एम १ श्रेणीच्या वाहनांमध्ये, पुढील रांगेतील बाहेरील बाजूने असणाऱ्या आसनावर बसणाऱ्या व्यक्तींसाठी प्रत्येकी एक, टू साइड / साइड टोर्सो एअर बॅग्स तसेच मागील रांगेत बाहेरील बाजूच्या आसनांवर बसणाऱ्या व्यक्तींसाठी प्रत्येकी एक टू साइड कर्टन /ट्यूब एअरबॅग्स बसवणे हे रस्ते आणि वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, १४ जानेवारी २०२२ च्या मसुद्याच्या जीएसआर १६ (ई ) द्वारे प्रस्तावित केले होते. वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी हे अधिसूचित करण्यात आले. त्यांनतर सर्व संबंधितांकडून अभिप्राय आणि हरकती मागविण्यात आल्या होत्या. संबंधितांकडून प्राप्त झालेल्या सूचना विचारात घेतल्यानंतर, रस्ते आणि वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, ३० सप्टेंबर २०२२ च्या जीएसआर ७५१ (ई ) मसुद्याद्वारे, अंमलबजावणीची तारीख सुधारून १ ऑक्टोबर, २०२३ करण्याचा प्रस्ताव ठेवला .तीस दिवसांच्या कालावधीत सर्व संबंधितांकडून पुन्हा एकदा अभिप्राय आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. प्राप्त झालेले अभिप्राय आणि सूचना मंत्रालयासमोर विचाराधीन असल्याची माहिती केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली.
ते पुढे म्हणाले की, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल्स मॅन्युफॅक्चरर्सकडे (एसआयएएम ) उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, ३,२७,७३० प्रवासी मोटारींच्या एकूण मासिक विक्रीच्या प्रमाणापैकी, एकूण ५५२६४ मोटारींपैकी केवळ १७ टक्के मोटारींमध्ये ६ एअरबॅग्ज आहेत. ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनकडे (एसीएमए ) उपलब्ध माहितीनुसार, देशातील सध्याची एअरबॅग उत्पादन क्षमता २२.७ दशलक्ष आहे आणि पुढील वर्षासाठी उत्पादनात अंदाजे ३७.२ दशलक्ष वाढ होईल. वाहने आणि वाहन घटकांसाठी सरकारने अधिसूचित केलेली उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना (पीएलआय ) एअरबॅग्स विनियोगाच्या दृष्टीने उदा. एअरबॅगसाठी इन्फ्लेटर, एअरबॅग इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट आणि एअरबॅगसाठी सेन्सर या घटकांच्या उत्पादनाला प्रोत्साहन प्रदान करते. एअर बॅगची निश्चित किंमत ही उत्पादित वाहन मॉडेलच्या कार्यशक्तीच्या प्रमाणावर आधारित असते आणि ती बाजार शक्तींद्वारे निर्धारित केली जाते. त्यामुळे, ४ एअरबॅग्ज [२ साइड एअर बॅग आणि २ कर्टन एअरबॅग्स] साठी अंदाजे परिवर्तनीय किंमत अंदाजे सहा हजार रुपये आहे.