नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुन्या वादातून १३ दिवसापूर्वी लॅमरोड येथे कोयत्याने हल्ला झालेल्या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. समीर पठाण (वय ३४) असे मृत तरुणाचे नाव आहे. २ डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी संशयित बाळा जाधव व दिनेश जाधव यांना ताब्यात घेतले आहे.
या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, २ डिसेंबर रोजी समीर पठाण या युवकावर सौभाग्यनगर-लॅम रोडवरील लक्ष्मी फार्मा मेडिकलसमोर जुन्या वादातून धारदार कोयत्याने हा हल्ला झाला होता. दुचाकीने मित्रासोबत पेट्रोल भऱण्यासाठी जात असतांना कारने त्याला मागून धडक दिली. त्यानंतर बाळा जाधव, दिनेश जाधव व इतर दोन जणांनी समीरबरोबर जुन्या वादाच्या कारणातून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या वादानंतर हातातील कोयत्याने त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आला. हे भांडण सोडविण्यासाठी मित्र धावला पण, त्यालाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे समीरच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्याच्या मित्राने आरडओरडा केला. त्यावेळी हल्लेखोर देवळाली कॅम्पच्या दिशेने पळून गेले. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने समीरला उपचारासाठी जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १३ दिवसाच्या उपचारानंतर त्याचा आज पहाटे त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूमुळे नाशिकरोड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.