समृद्ध पाणथळी
नाशिक जिल्ह्याचे वैविध्य प्राथमिकपणे त्याच्या भूतलावरच्या भूखंडिय अस्तित्वावर अवलंबून आहे. समशीतोष्ण कटिबंधात असणाऱ्या, बहुतांश भूखंडांचे अस्तित्व नाशिक जिल्ह्याला लाभले आहे. डोंगराळ, खडकाळ, उष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित वने, उष्णकटिबंधीय शुष्क पानगळीची वने, हरित माळराने, उजाड माळराने, पाणथळ जागा, धरणे, नद्या, दमट जमीन, शुष्क जमीन, अर्धवाळवंटीय माळराने इत्यादींनी नाशिक जिल्ह्याला खरेखुरे वैविध्य मिळवून दिले आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी एकेक ecosystem (परिसंस्था) निर्माण झाली आहे. अशाच महत्वाच्या परिसंस्थांची व त्यामुळे निर्माण होणाऱ्या जैवविविधतेची माहिती आपण पुढील काही लेखांमध्येही घेणार आहोत. नाशिक जिल्ह्यामध्ये ठळकपणे काही पाणथळ जागा आहेत. त्या संदर्भात आज आपण जाणून घेऊ या…
आपण यापूर्वीच पाहिले की, नाशिक जिल्ह्यात २९ धरणे, सात ते आठ नद्या, कालवे स्थित आहेत. यातील धरणे आणि कालवे मानवनिर्मित आहेत. बहुतांश धरणे ही पश्चिम घाटाच्या पायथ्याशी आहेत. यातील काही धरणे खोल व लांबीला जास्त आहेत. पाण्याची साठवण शक्ती पण जास्त आहे. गंगापूर, दारणा, ओझरखेड, करंजवण, मु कणे, गिरणा, चणकापूर, कडवा ही मोठी धरणे आहेत. तर काश्यपी, आळंदी, वालदेवी, पालखेड, भो जापूर, हरणबारी, वाघाड आणि इतर ही मध्यम स्वरूपाची धरणे आहेत. नांदूरमध्यमेश्वर हा बंधारा आहे. या प्रकल्पात सर्वात कमी साठणशक्ती आहे. त्याचप्रमाणे रंथाळे (दिंडोरी जवळ), खंबाळे (अंजनेरी जवळ) या सारखी नैसर्गिक तळी आणि इतर बरेचसे छोटे छोटे जलप्रकल्प नाशिक जिल्ह्यात आहेत. या सर्व जलप्रकल्पांच्या क्षमतेनुसार आपापल्या संलग्न परिसंस्था तयार झाल्या आहेत. आणि यामुळेच जैवविविधतेमध्ये भर पडत गेली. आपण उदाहरण दाखल प्रत्येक प्रकारातील परिसंस्थांचा परिचय करून घेऊ या.
पाणथळ जागेवर सर्वात जास्त प्रकारचे जीव अवलंबून राहतात. कुठल्याही जीवाला अन्न,पाणी, निवारा यांची गरज असते. आणि पाणथळ जागा ही गरज सर्वात जास्त पुरवठा करू शकतो. म्हणूनच मानवासकट जास्तीत जास्त जीव येथे आकृष्ट होतात. पाणथळ जागेचा आपण जर उभा छेद (Cross section) अभ्यासला तर यातील बऱ्याच गोष्टींचे आकलन होते. या संदर्भात ही आकृती बघावी. पाणी,मृदा,तापमान आणि आर्द्रता हे घटक व सूर्यप्रकाश यांच्यामुळे जीवसृष्टीची वाढ होते. आणि प्रथम वाढणारा घटक म्हणजे वनस्पती. म्हणून या चित्रात वेगवेगळ्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारच्या वनस्पतींची वाढ होते ते बघू शकतो.
पाणथळ जागेच्या खोलगट पाण्याच्या जागेपासून ते किनाऱ्याकडे जाऊ लागल्यास आपण सात प्रकारच्या वनस्पतींची विभागणी करू शकतो. जिथे सूर्यप्रकाश पाण्याच्या तळापर्यंत पोहोचू शकतो, तेथून वनस्पतींची वाढ सुरू होते. सूर्यप्रकाशामुळे वनस्पती त्यांचे अन्न तयार करू शकतात.
सर्व प्रथम हरित प्लवके म्हणजेच Phytoplankton ही सूक्ष्म वनस्पती पाण्याच्या तळाशी आढळते. या प्रकारात विविध प्रकारची शैवाल आढळून येतात. छोटे जलकीटक, जलचर प्राणी, मासे यांचाही येथे वावर असतो. सूक्ष्म वनस्पतीपासून या प्राण्यांना खाद्य मिळते. तर या प्राण्यांच्या उत्सर्जनावाटे सूक्ष्म वनस्पतींना खाद्य मिळते, अशी परोपकारी जैविकता येथे आढळते. आकर्षक रोहित पक्षी म्हणजेच फ्लॅमिंगो पक्षी सुद्धा येथे पाण्यात उभे राहून आपली S आकाराची मान पाण्यात बुडवून शैवाल खाताना दिसतात. शैवाल हे फ्लॅमिंगो पक्ष्याचे प्रमुख अन्न आहे.
त्यानंतर पाण्यात बुडालेली वनस्पती म्हणजे Emergent आढळते. या वनस्पतींचे खोडपण पाण्यात बुडालेली असतात. थोड्या प्रमाणात पाने पाण्याच्या वरती असतात. सर्व प्रकारच्या लिली वनस्पती, जलचर कीटक, टॅडपोल, बेडुक यांचा येथे वावर असतो. बेडूक मासे हे ज्या पक्ष्यांचे अन्न आहे असे पाणकावळे, पाणडुबी, बदके यांचा येथे संचार असतो.
जलतरंगी (floating plants) म्हणजेच पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पतींचा समावेश होतो. बेडकांचे हे प्रमुख अधिवासाचे ठिकाण आहे. बेडूक हा उभयचर प्राणी असल्याने, पाण्याखाली आणि पाण्यातूनवर पण याचा वावर असतो. जलपिंपली ही वनस्पती येथे जास्त आढळून येते. त्याचप्रमाणे बेडूक किंवा जलचर हे ज्या पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे असे बगळे, बलाक, चमचा या सारखे पक्षी पाण्यात उभे राहून येथे शिकार करताना दिसतात.
पाण्यातून डोकावणारी वनस्पती म्हणजे aquatic submerged. अर्ध्या पाण्यात आणि अर्ध्या वरती असतात. कोलशिंदा, पॉंडविड या सारख्या जलवनस्पतींची येथे वाढ होताना दिसते. बेडूक, मासे आणि इतर जलचर यांचा येथे वावर असतो. तसेच सर्व प्रकारचे बगळे, खंड्या पक्षी आपली शिकार येथे साधताना दिसतात.
आता जलसाठ्याच्या किनारीच्या वनस्पती म्हणजेच Fringing plants. यामध्ये बेशरमी, नळीची भाजी, पाणकणीस या सारख्या वनस्पतींची वाढ प्रामुख्याने दिसते. या भागात काही पक्षी मोठ्या संख्येने घरटी करताना आपणास दिसतात. जांभळी पाणकोंबडी, कमळपक्षी, वारकरी या सारखे पक्षी घरटे करताना दिसतात. त्याचप्रमाणे छोटे कीटक, गांडूळे, खेकडे या प्राण्याची रेलचेल पाणकिनारी दिसते. तुतवार, चिलखा, टिवळा, शेका ट्या, शराटी यासारखे असंख्य पाण्याच्या काठावर राहणाऱ्या पक्ष्यांची पण येथे रेलचेल आपणास आढळते.
या नंतर गवताळ आणि झाडाझुडपांचा प्रदेश चालू होतो. या संबंधात आपण माहिती पुढील भागात माहिती घेऊ. तर अशा या समृद्ध पाणथळ जागा नाशिक जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी आहेत त्या आपण पुढील लेखात बघू या.