नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- साडी खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरलेल्या ग्राहक दांम्पत्याने गल्यातील रोकड हातोहात लांबविली. ही घटना वर्दळीच्या दहिपूल भागात घडली. या घटनेत दुकान मालकास बोलण्यात गुंतवून भामट्या बंटी बबलीने एक लाख १० हजाराची रोकड पळविली असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन पृथ्वीराज बेदमुथा (रा.लामखेडमळा,तारवालानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बेदमुथा यांचे दहिपूल परिसरात दर्पण साडीज नावाचे दुकान आहे. गेल्या मंगळवारी (दि.४) सायंकाळच्या सुमारास अनोळखी दांम्पत्य साडी खरेदीसाठी दुकानात आले होते. बेदमुथा हे साड्या दाखवित असतांना दांम्पत्याने त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांचे लक्ष विचलीत करीत ही चोरी केली.
भामट्या ग्राहकाने मालकाचे लक्ष नसल्याची संधी साधत हातचलाखीने काऊंटरच्या गल्या ठेवलेली रोकड चोरून नेली. ही घटना बेदमुथा यांच्या उशीराने लक्षात आली. मात्र तत्पूर्वीच भामट्या बंटी बबलीने पोबारा केला होता. अधिक तपास दहिफळे करीत आहेत.
मोबाईल व लॅपटॉप चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उघड्या घरात शिरून चोरट्यांनी चार्जिंगला लावलेला मोबाईल व लॅपटॉप चोरून नेला. ही घटना तपोवन कॉर्नर भागात घडली असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पृथ्वीराज महेंद्र देशमुख (मुळ रा.नेवपूत ता.कन्नड हल्ली कृष्णनगर,तपोवन कॉर्नर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. देशमुख बुधवारी (दि.१२) रात्री घरात असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात शिरून टेबलावर ठेवलेला लॅपटॉप व चार्जीगला लावलेला मोबाईल असा सुमारे ४२ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.