इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– जगातील सर्वांत मोठे मंदिर –
नाद निर्माण करणारे
दगडी स्तंभ असलेले
नेलायप्पार मंदिर!
(क्षेत्रफळ ७१,००० चौ.. फुट)
जगातील सर्वांत मोठे मंदिर या ‘इंडिया दर्पण’च्या विशेष लेखमालेत आज आपण ‘नेलायप्पार मंदिरा’चा परिचय करुन घेणार आहोत.
तमिलनाडुतील कन्याकुमारी पासून सुमारे १०० किमी अंतरावर असलेल्या तिरुनेलवेली येथे भगवान शिवाचे सुमारे एक हजार वर्षांचे प्राचीन मंदिर आहे. स्वामी नेलायप्पार नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे. भगवान शंकराला येथे ‘नेलियाप्पार’,’नल्लईपार’, ‘नेलायप्पार’ किंवा ‘वेणुवनाथ’ अशा विविध नावांनी ओळखतात तर देवी पार्वतीला येथे ‘कांतिमधी अम्मन’ असे म्हणतात.

मो. ९४२२७६५२२७
तिरुनेलवेली जिल्ह्यात धामीबरानी नदीच्या उत्तर तटावर हे मंदिर आहे. चौदा एकर जागेवर हे मंदिर वसलेले असून मंदिरातील प्रत्येक जलकुंड आयताकार दगडी बंधाणीचे आहेत. या मंदिराच्या परिसरांत अनेक मंदिरं आहेत यांत ‘स्वामी नैलायप्पर’ आणि ‘श्री कांतिमधी अम्मन’ यांची मंदिरं प्रमुख आहेत.
दगडी बांधणीचे चौदा एकर विस्तृत जागेवर पसरलेले हे मंदिर विविध प्रकारच्या शिल्पकृतींनी समृद्ध आहे. परंतु एवढे एकच या मंदिराचे वैशिष्ट्ये नाहीये. या मंदिरात नंदी मंडपम जवळ मणि मंडपम नावाचा एक मंडप आहे. या मंडपांत जे दगडी स्तंभ किंवा खांब आहेत त्यांना संगीत स्तंभ असे म्हणतात. या दगडी खांबाचे वैशिष्ट्ये म्हणजे या खांबामधून संगीताचे नाद मधुर स्वर ऐकू येतात. दगडी स्तंभातुन नाद येणं हाच एक मोठा चमत्कार समजला जातो. तिरुनेलवेलीचं हे स्वामी नेलायप्पारमंदिर यासाठीच जगप्रसिद्ध आहे.
समृद्ध इतिहास
तिरुनेलवेली एक पवित्र धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. हजार बाराशे वर्षांची समृद्ध परंपरा या क्षेत्राला आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची झाडांची जंगलं आहेत. झाडावरून इथल्या देवी देवतांना नावं देण्यात आली आहेत. या ठिकाणी बांबूची झाडं मोठ्या प्रमाणात असल्याने या वनाला वेणुवनम म्हणतात. पौराणिक कथा आणि येथे असलेल्या शिलालेखांवरून या मंदिराचे दोन्ही मोठे गोपुरम म्हणजे प्रवेशद्वारं पांडये राज्यकर्त्यांनी बांधली आहेत. तर सातव्या शतकात या प्रदेशावर राज्य करणार्या निंदरेसर नेदुमारन या राजाने मंदिराच्या गर्भ गृहाची निर्मिती केली आहे.
तिरुनेलवेलीच्या स्वामी नेलायप्पार मंदिराचे वेगळेपण म्हणजे पूर्वी स्वामी नेलायप्पार आणि श्री कान्तिमधी यांची दोन वेगवेगळी मंदिरं होती. इ.स. १६४७ मध्ये वडामालियप्पा पिलैयन नावाच्या महान शिवभक्ताने ‘चेन मंडपम’ किंवा तमिळ भाषेत ‘सांगली मंडपम’ची निर्मिती करुन ही दोन्ही मंदिरं एकमेकांना जोडली.
चेन मंडपमच्या पश्चिम भागात फुलांचे एक अतिशय सुदंर उद्यान आहे. इ.स. १७५६ मध्ये थिरुवेनगडाकृष्ण मुदलियार यांनी हे उद्यान निर्माण केले या फ्लावर्स गार्डनच्या मध्यभागी ‘वसंत मंडपम’ नावाचा १०० स्तंभांचा एक प्रेक्षणीय दगडी सभागृह आहे.
स्वामी नेलायप्पार म्हणजे भगवान शंकर असल्याने येथे देखील तंजावुर आणि रामेश्वरम सारखा अतिशय भव्य नंदी शिवा समोर आहे. या नंदी साठी जो नंदी मंडपम आहे तो सिवंतीय्प्पा नायक यांनी इ.स. १६५४ मध्ये बांधला असून नंदीच्या जवळ असलेला ध्वजस्तंभ मात्र इ.स. ११५५ मध्ये उभारण्यात आलेला आहे.
शिल्पकला
स्वामी नेलायप्पार मंदिर म्हणजे तमिल शिल्पकलेचा जीता जागता अविष्कार आहे. मंदिराच्या सुरुवाती पासून संपूर्ण 14 एकर जागेत शिल्पकलेचे एकापेक्षा एक सुंदर नमूने पाहून कुणीही थक्कं होवून जातं. या मंदिराला दोन गोपुरम आहेत हे दोन्ही गोपुरम ८५० फुट लांब आणि ७५६ फुट रुंदीचे आहेत.
संगीत स्तंभ
मणि मंडपम मधील नाद निर्माण करणारे दगडी स्तंभ पाहण्या साठी जगभरातुन येथे पर्यटक आणि भाविक येतात. नंदी मंडपम जवळच हा मंडपम आहे. येथे दोन महाकाय स्तंभ असून ते दोन्ही एकाच दगडातुन निर्माण करण्यात आले आहेत. या प्रत्येक स्तंभाला ४८ उप-स्तंभ आहेत. याच दगडी स्तंभातुन हाताने मारले तरी नाद ऐकू येतो.
उत्सव
मंदिरांत स्वामी नेलायप्पार आणि कांतिमधी अम्मन यांची दररोज सहा प्रकारे नित्य पूजा केली जाते. तसेच वर्षभर विविध उत्सव साजरे केले जातात.
Nellaiappar Temple (Arudra Darshanam) pic.twitter.com/s8OzqRGfpF
— @Bala (@neelabala) January 6, 2023
नवरात्रीत अयिपसी तिरुकल्याणम आणि अरुद्र दरिसनम हे येथील महत्वाचे उत्सव.याप्रसंगी लाखो भाविक मंदिरांत येतात.
जून-जुलाई महिन्यात येथे मोठा रथोत्सव साजरा केला जातो. या मंदिरांत विनयाकार, मुरुगन, नेल्लाईप्पार, कांतिमधी आणि संदिकेश्वरार या प्रत्येक देव देवतेचे भव्य रथ आहेत. स्वामी नेलायप्पार यांचा रथ ४०० टन वजनाचा असून तो तमिलनाडुतील दुसर्या क्रमांकाचा मोठा रथ आहे. विशेष म्हणजे या रथाला स्टील ची चाकं असून रथोत्सव काळात हा रथ आटोमॅटिक पद्धतीने चालतो.
मंदिर परिसरात अनेक मंडपम आहेत यांत उन्जाला मंडपम आणि १००० स्तंभाच्या हॉलचा समावेश होतो. दरवर्षी ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये येणार्या तमिल महिना अयिपसी मध्ये कांतिमधी अम्मन आणि स्वामी नेलायप्पार यांचा विवाह लावला जातो. त्यावेळी येथे हजारो तरुण तरुणींचे सामुदायिक विवाह संपन्न होतात.
मंदिराचे संकेतस्थळ www.kanthimathinellaiappar.tntrce.in
विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७
Worlds Largest Temple nellaiappar temple Tamil Nadu by Vijay Golesar