मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील ११ जणांचा काल उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मात्र, आता या बळींची संख्या वाढली आहे. आज आणखी एकाचा बळी गेला आहे. त्यामुळे मृतांची संख्या एकूण १२ झाली आहे. तर, २३ जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे की, मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे रात्री आठच्या सुमारास आले होते. मुख्यमंत्र्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्याचबरोबर तेथील डॉक्टर्ससोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली.
यावेळी माध्यम प्रतिनीधींशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, उष्माघाताचा त्रास झाल्याने श्री सदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सोहळ्याच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी काही श्री सदस्यांवर प्राथमिक उपचार केले. काहींना रुग्णालयात हलवावे लागले. एमजीएम रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समन्वयासाठी पनवेल महापालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळ्यादरम्यान उष्माघातामुळे प्रकृती बिघडून उपचार घेत असलेल्या श्रीसदस्यांची एमजीएम रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. डॉक्टरांशी बोलून सर्वांच्या प्रकृतीची माहिती घेतली. pic.twitter.com/av4LCOh5z1
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 17, 2023
राज ठाकरे म्हणाले…
काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का? सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी. ह्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे.
Maharashtra Bhushan Award Ceremony Heat Stroke Death Toll Increase