नाशिक – केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत दरवर्षी आंतराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला कल्याण क्षेत्रात असामान्य व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना तसेच उत्कृष्ट संस्थांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्कारसाठी इच्छुक महिला व संस्थांनी 31 जानेवारी 2022 पर्यंत ऑनलाईन नामनिर्देशन सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अजय फडोळ यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, नारी शक्ती पुरस्कार केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत सन 2016 पासून दरवर्षी प्रदान केला जातो. पुरस्कारासाठी जिल्ह्यातील महिला कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व सेवाभावी संस्थांनी www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नामांकन सादर करावयाचे आहे. नामनिर्देशन सादर करावयाची पद्धत, आवश्यक पात्रता, वयाची अट, अनुभव व आवश्यक कागदपत्र यासंबधीची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पुरस्कार बाबत अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नासर्डी पुलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड या कार्यालयात किंवा दूरध्वनी क्रमांक 0253-2236368 यावर संपर्क साधावा असेही, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अजय फडोळ यांनी कळविले आहे.