नाशिक : स्वत:च्या अल्पवयीन मुलीस वेश्या व्यवसायास लावणा-या नराधम बापास अतिरिक्त सत्र न्यायालयाने दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. २००७ मध्ये पंचवटी परिसरात ही घटना घडली होती. या खटल्यात फिर्यादीच आरोपी बनला असून त्याच्या तीन साथीदारांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यात दोन महिलांचा समावेश आहे. हा खटला न्या. विकास कुलकर्णी यांच्या कोर्टात चालला. दत्तात्रेय मुरलीधर चव्हाण असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ निरीक्षक धनराज दायमा यांनी करुन पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. सरकार तर्फे अॅड. भानूप्रिया पेठकर यांनी काम पाहिले. न्यायालयाने आरोपी चव्हाण यास फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २३५ (२) अन्वये, भारतीय दंड संहितेच्या कलम ३७२ नुसार दोषी ठरवत दहा वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने सश्रम कारावासची शिक्षा निकालपत्रात नमुद करण्यात आली आहे. या खटल्यात बलात्काराच्या गुन्ह्यातील संशयीतास आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ३७२ आर/डब्ल्यू ३४ अन्वये शिक्षापात्र गुन्ह्यातून दोन महिलांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
असा दाखल झाला गुन्हा
आईच्या मुत्युनंतर मुलगी गोंदे दुमाला ता.इगतपुरी येथे आपल्या आजी कडे राहत होती. मार्च २००७ मध्ये आरोपीने मुलीस आपल्या नवनाथनगर येथील घरी आणले होते. २१ मार्च ते २१ नोव्हेंबर २००७ या काळात सावत्र आई समवेत राहत असतांना मुलीस वेश्या व्यवसायात लोटण्याचा प्रयत्न झाला. या छळास कंटाळून तिने आपले आजीचे घर गाठले होते. परंतू पुन्हा नवनाथनगर येथे तिला आणले. ब्युटी पार्लर क्लासचे आमिष दाखवत तिला अन्य दोन महिलांच्या माध्यमातून पुणे येथे पाठविण्यात आले. या ठिकाणीही तिला देहविक्री करण्यास भाग पाडण्यात आल्याने तीने धुम ठोकली होती. याप्रकरणी आरोपीने पंचवटी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याबाबत मिसींग दाखल केली होती. कालांतराने मुलीने आपल्या भावासह पोलीस ठाणे गाठून जबाब नोंदविल्याने नराधम बापासह त्याचा एक साथीदार आणि दोन महिलांविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.