इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– पॅव्हेलिअन –
कॅमरुन ग्रीन
मुंबई इंडियन्सने यंदा ऑस्ट्रेलियाचा उगवता अष्टपैलू खेळाडू कॅमरुन ग्रीन या खेळाडूला तब्बल १७ कोटी ५० लाख रुपयांची मोठी बोली लावून संघात घेतले आहे. गतवर्षीच्या आयपीएल सीझनमध्ये झालेल्या चुका सुधारण्यासाठीच मुंबई इंडियन्सने हा डाव खेळला आहे. कोण आहे कॅमरुन ग्रीन, त्याला एवढ्या महागड्या बोलीत का खरेदी केले, यासंदर्भात सांगत आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक जगदीश देवरे…
मागच्या सीझनमध्ये जवळपास १२.५० करोड खर्च करून मुंबई इंडियन्सने ईशान किशनला स्वतःकडे राखलं होतं. परंतु, संघ असमतोल असल्याने मुंबई इंडियन्सची पुरती वाताहत झाल्याचं बघायला मिळालं. आता मात्र संघ व्यवस्थापनाने एक परदेशी अष्टपैलू खेळाडू आपल्या बाजूला घेऊन आपले इरादे स्पष्ट केले आहेत. कुठल्याही ऑस्ट्रेलियन खेळाडूला दिली जाणारी ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च मोठी रक्कम असणार आहे. कॅमरुन ग्रीनच्या नावाची घोषणा झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चांगलीच थरारक बोली लागलेली बघायला मिळाली. परंतु, मुंबईने मात्र अखेरीस बाजी मारली.
असा हा २३ वर्षीय कॅमरून ग्रीन आहे तरी कोण? हा प्रश्न त्यानंतर सहाजिकपणे विचारला जातोय. लिलावाची प्रक्रिया लाईव्ह बघतांना स्वतःवर लागलेली किंमत बघून खरंतर कॅमरन ग्रीन खजिल झाला होता. अखेरीस मुंबई इंडियन्स यासारख्या आयपीएलमधील मोठ्या पावर हाऊस संघाकडे आपली वर्णी लागल्याचे बघून त्यालाही आनंद झालाय.
https://twitter.com/mipaltan/status/1606597451732893701?s=20&t=a2_tj_YS14abcxHKcWsoOw
कॅमरुन हा काही फार नावाजलेला खेळाडू नाही. मात्र गेल्या एक-दोन सीझन मधून एक उगवता तारा म्हणून ग्रीनची ओळख आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगताला झालेली आहे. एक उत्कृष्ट ‘स्ट्रायकर’ असलेला ‘फलंदाज’, प्रती तास १४० किलोमीटर वेगाने गोलंदाजी करू शकणारा वेगवान ‘गोलंदाज’ आणि मैदानावर काही अप्रतिम झेल टिपून स्वतःला एक चांगला ‘क्षेत्ररक्षक’ म्हणून सिद्ध करणारा क्षेत्ररक्षक अशी ओळख त्याने निर्माण केली आहे. कॅमरुन ग्रीन मुंबईने हातचा जाऊ दिलेला नाही तो त्याच्या या वैशिष्ट्यपूर्ण गुणांमुळेच. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्षितीजावर २०२० आलेला ग्रीन ऑस्ट्रेलियन संघाकडून १८ कसोटी सामने खेळला आहे. त्याने या सर्वसामन्यांमध्ये त्याचे अष्टपैलूत्व सिद्ध केले आहे.
ऑस्ट्रेलियासाठी अतिशय महत्त्वाची असलेली बॉक्सिंग डे कसोटी ही त्याची १८ वी कसोटी सध्या सुरू असून यातल्या एका डावात पाच बळी घेण्याचे श्रेय ग्रीनने पूर्ण करून दाखवलंय. या खेरीज १३ एक दिवसीय सामन्यात ५८ च्या सरासरीने २९० धावा आणि ११ बळी ही त्याच्या अष्टपैलूत्वाची एक मोठी कामगिरी ठरते. क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात ग्रीनला दुखापतीने भरपूर त्रास दिलाय. परंतु, त्यानंतर मात्र ग्रीनने मागे वळून बघितलेलं नाही अवघ्या ८ टी-ट्वेंटी सामन्याचा अनुभव ग्रीनकडे असताना देखील त्याच्यावर इतकी मोठी बोली का लावली गेली असावी?
त्याचे उत्तर हे त्याच्या स्ट्राईक रेट मध्ये सापडते. त्याचा स्ट्राईक रेट आहे १७३.२५. आयपीएलमध्ये आता मुंबईसाठी कायरन पोलार्ड असणार नाही. कदाचित याच कारणास्तव कॕमरुन ग्रीनची निवड झाली असून ‘मॅच फिनिशर’ म्हणून असणारी महत्त्वाची जबाबदारी ग्रीनकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. वयाच्या १० व्या वर्षीच ग्रीनची निवड १३ वर्षाखालील आॕस्ट्रेलियन संघात झाली होती. तो मुळचा गोलंदाज, परंतु काळाची गरज ओळखून त्याने स्वतःला फलंदाजीत देखील साबित केले आहे. मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासात पाच वेळेला विजेते ठरले आहेत. यावेळेला कॕमरुन ग्रीनच्या महागड्या आगमनानंतर विजयाची ही हिरवळ मुंबई संघासाठी उपयुक्त ठरेल की नाही हे मात्र येणारा काळच ठरवेल.
https://twitter.com/mipaltan/status/1606636196691869698?s=20&t=a2_tj_YS14abcxHKcWsoOw
Why Cameron Green Selected for IPL Costly Auction by Jagdish Deore
Column Pavellion Mumbai Indians IPL2023 Cricket T20