ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर येथे झालेल्या भीषण अपघातात ज्येष्ठ उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे निधन झाले आहे. मर्सिडीज या आलिशान आणि अतिशय महागड्या कारचा हा अपघात सध्या खुप चर्चेत आहे. सायरस यांची ही कार अनाहिता पंडोले चालवित होत्या. त्या कोण आहेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
शापूरजी पालोनजी समूह उद्योगाचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री (वय ५४) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत मृत्यूमुखी पडलेली दुसरी व्यक्ती म्हणजे त्यांचा जवळचा मित्र जहांगीर दिनशॉ पंडोले. याच कारमध्ये आणखी दोन जणही होते. त्यापैकी एक होते डॅरियस पंडोले आणि दुसऱ्या होत्या अनाहिता पंडोले. अनाहिता याच कार चालवित होत्या. हा अपघात चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जाते. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी वापी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
चारोटी नाक्याजवळ सूर्या नदीवर बांधलेल्या नवीन पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार पुलाच्या भिंतीला धडकली. ही दुर्घटना एवढी भीषण होती, की मिस्त्री बसलेल्या भागाच्या दिशेने समोरून गाडीचे प्रचंड नुकसान झाले. एअर बॅग असूनही जोरदार धडकेमुळे मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. मिस्त्री, जहांगीर यांच्या मृतदेहाचे मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन केले जाणार असून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे. कार चालवणाऱ्या अनाहिता पंडोले या व्यवसायाने निष्णात डॉक्टर असून त्या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. अनाहिता या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात सेवा बजावतात. याशिवाय, मरीन लाइन्स येथे होर्डिंग्जविरोधात लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अशीही त्यांची ओळख आहे.
अनाहिता या त्यांचे पती डॅरियस यांच्यासमवेत कारमधून प्रवास करत होत्या. अनाहिता यांचे पती डॅरियस हे स्वत: जेएम फायनान्शियलच्या प्रायव्हेट इक्विटीचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून कार्यरत आहेत. अपघातानंतर डॅरियस आणि अनाहिता यांना वापीच्या रेनबो हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. दोघांनाही अनेक फ्रॅक्चर झाले आहेत. परंतु आता हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसत आहे.
Who is Anahita Pandole Drive Cyrus Mistry Car Accident
Palghar Mercedes Road Accident Ahmedabad Mumbai Highway