इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढताना दिसत आहेत. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) आज सकाळीच राष्ट्रीय जनता दलाच्या अध्यक्ष राबडी देवी यांच्या निवासस्थानी छापे टाकले आहेत. सीबीआयचे पथक लालूंच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरी पोहोचले. नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्यावरून हा छापा टाकण्यात आला. लालूप्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी, मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, खासदार कन्या मीसा भारती आणि लालूंचे अनेक निकटवर्तीय या घोटाळ्यात अडकले आहेत. हा घोटाळा नेमका काय आहे ते आपण आता जाणून घेऊ… काय आहे हा जमिनीसाठीचा घोटाळा? यामध्ये लालूंच्या कुटुंबियांची भूमिका काय होती?
आज सकाळी सीबीआयचे पथक बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि लालू यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या निवासस्थानी पोहोचले. यापूर्वी ऑगस्टमध्ये याच प्रकरणात सीबीआयची टीम लालू आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या घरी एकत्र छापे टाकण्यासाठी पोहोचली होती. त्यानंतर बिहारमध्येच नव्हे तर बिहारबाहेरही हे छापे पडले होते. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालू यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांच्या गुरुग्राम मॉलमध्येही सीबीआय पोहोचली होती. याशिवाय सीबीआयचे पथक राजद खासदार अशफाक करीम, फयाज अहमद, एमएलसी सुनील सिंग आणि सुबोध राय यांच्या घरीही पोहोचले. या प्रकरणी सीबीआयने राजदचे माजी आमदार भोला यादव यांनाही अटक केली आहे.
२००४ ते २००९ दरम्यान लालू प्रसाद यादव यूपीए सरकारमध्ये रेल्वेमंत्री होते. त्यावेळी रेल्वे भरतीत घोटाळा झाल्याचा आरोप आहे. नोकरी देण्याच्या मोबदल्यात अर्जदारांकडून जमीन आणि भूखंड घेतल्याचे बोलले जात आहे. सीबीआयने या प्रकरणाचा तपास केल्यानंतर लालू प्रसाद यादव आणि त्यांची मुलगी मिसा भारती यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. ज्या जमिनी घेतल्या आहेत त्या राबडी देवी आणि मिसा भारती यांच्या नावावरही घेतल्याचा आरोप आहे.
यूपीए सरकारमध्ये रेल्वेमंत्री राहिलेल्या पवन बन्सल यांचा पुतण्या विजय सिंगला यांच्यावरही रेल्वे भरतीशी संबंधित आणखी एका घोटाळ्याचा आरोप आहे. या प्रकरणीही सीबीआयने विजय सिंगला यांच्यासह १० जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात विजय सिंगला यांच्यावर मनी लाँड्रिंगचाही आरोप आहे.
आयआरसीटीसी प्रकरण रेल्वे भरती घोटाळ्यापेक्षा वेगळे आहे. IRCTC घोटाळ्याचा आरोपही लालूंवर २००४ मध्ये रेल्वेमंत्री असताना झालेला आहे. खरे तर रेल्वे बोर्डाने त्यावेळी रेल्वे खानपान आणि रेल्वे हॉटेल सेवा पूर्णपणे IRCTC कडे सोपवली होती. यादरम्यान, रांची आणि पुरी येथील बीएनआर हॉटेलच्या देखभाल, संचालन आणि विकासासाठी सुरू असलेल्या निविदेत अनियमितता असल्याच्या बातम्या आल्या होत्या.
ही निविदा २००६ मध्ये सुजाता हॉटेल या खासगी हॉटेलला मिळाली होती. सुजाता हॉटेल्सच्या मालकांनी त्याऐवजी पाटण्यात तीन एकर जमीन लालू यादव कुटुंबाला दिली. ती बेनामी मालमत्ता होती. या प्रकरणात लालू यादव, राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्यासह अनेक जण आरोपी आहेत.
What is Land for Job Scam RJD Rabari and Lalu Yadav