माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल झाला आहे. त्यातच अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकरी वर्गात प्रचंड धास्ती निर्माण केली आहे. राज्याच्या अनेक भागात शेतपिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यातच आता पुढील दोन दिवस नक्की कसे हवामान राहिल, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. त्याविषयीच आपण आता जाणून घेऊ…
आज व उद्या (गुरुवार, शुक्रवार २३, २४ मार्च) रोजी २ दिवस मुंबई सह संपूर्ण कोकणातील ४ जिल्ह्यात तसेच आज गुरुवार, २३ ते रविवार २६ मार्च पर्यन्तच्या ४ दिवसात मध्य महाराष्ट्रातील १० व मराठवाड्यातील ८ अश्या १८ जिल्ह्यात ढगाळ वातावरणासहित अगदीच तुरळक ठिकाणी गडगडाटी वातावरणाची शक्यता जाणवते.
अर्थात शेतकऱ्यांनी ह्या वातावरणाची अति धास्ती मनी बाळगू नये, असे वाटते. मात्र गाफिल न राहता पीक काढणीची सावधानता बाळगावी, असे वाटते. परंतु संपूर्ण विदर्भात त्यातही विशेषतः नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात २५ ते २७ मार्च (शनिवार ते सोमवार) असे ३ दिवस गडगडाट व गारपीटसह किरकोळ ठिकाणी पावसाची शक्यता जाणवते.
वरील सर्व अवकाळी पावसाचे वातावरण हे सध्या गेल्या ३ दिवसांपासून महाराष्ट्रासहित मध्य भारतात कार्यरत असलेल्या ‘वारा खंडितता’ ह्याच व्यापक अशा वातावरणीय वैशिष्ट्यामुळे घडून येत आहे.
तूर्तास इतकेच!
आजच्या (२३ मार्च) जागतिक हवामान दिनाच्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
Weather Forecast for Farmers upcoming Days Climate