औरंगाबाद (बिहार) – येथे लाजिरवाणी आणि माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आपल्या बाजूने मतदान न करणाऱ्या दलित युवकांना उठाबशा काढायला लावल्या तसेच थुंकी चाटण्यासाठी सक्ती करण्याची घटना घडली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान आरोपी सरपंचपदाच्या उमेदवाराने हा प्रकार केला आहे.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कुटुंबा प्रखंड येथील अंबा पोलिस ठाणे क्षेत्रातील डुमरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील खरांटी टोले भुईयां बिगहा येथील असल्याचे बोलले जात आहे. व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी कारवाई करत आरोपी, सरपंचपदाचे उमेदवार बलवंत कुमार याला अटक केली आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी मतदान न करणार्यांना मारहाण करण्याची घटनाही घडली आहे. अनिल कुमार भुइयां आणि मंजित भुइयां अशी पीडितांची नावे आहेत. या युवकांसमोर सरपंचपदाचे उमेदवार बलवंत कुमार दिसत आहे. बलवंत कुमार या युवकांना उठाबशा काढताना लाथ मारतानाही दिसत आहे. निवडणुकीदरम्यान कुमार याला मतदान न केल्याने त्याने असे कृत्य केल्याचा आरोप आहे.
#Bihar : वोट नहीं देने की मिली तालिबानी सजा, थूक कर चटवाया, आरोपी गिरफ्तार pic.twitter.com/zmDkJ2QBIi
— Hindustan (@Live_Hindustan) December 12, 2021
आरोपी बलवंत कुमार सिंघना गावाचा रहिवासी आहे. व्हायरल व्हिडिओच्या तक्रारीवरून पोलिस आयुक्त कांतेश कुमार मिश्रा यांच्या निर्देशावरून अंबा पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिस निरीक्षक नरेंद्र कुमार म्हणाले, की पीडित मंजित भुइयां याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून, पुढील कारवाई केली जाईल. आरोपीने त्याच्यावरील आरोप फेटाळले आहेत. युवक दारूच्या नशेत गोंधळ घालत होते. मतमोजणीच्या दिवसापासूनच हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, मारहाण करणारा सरपंचपदाचा उमेदवार बलवंत कुमार सारखी शिवीगाळ करत आहे. तसेच दहा हजार रुपयांची दारू प्यायलाचा आरोपही पीडित युवकांवर करत आहे. महादलितांबद्दल अनेक आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत आहे. पीडित युवकांनी आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची कोणीही मदत केली नाही. यादरम्यान एका स्थानिक व्यक्तीने व्हिडिओ बनवला. उठाबशा काढताना सर्व मर्यादा पार करण्यात आल्या. दोन्ही पायांना जोडून उठाबशा काढण्यास सांगण्यात आले. अधूनमधून शिवीगाळही करण्यात आली. पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला आहे.