इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्ये क्रिकेट प्रेमींची संख्या प्रचंड प्रमाणावर आहे. क्रिकेट सामने पाहण्यासाठी येथील प्रेक्षक काहीही करू शकतात, याचा प्रत्यय नुकताच आला. सध्या पाकिस्तान सुपर लीग (PSL) बाबत देशातील क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे आणि त्यात लहान मुलांचाही सहभाग आहे. भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही क्रिकेटचा ज्वर चढत आहे. पीएसएलचा सातवा हंगाम सध्या कोरोना महामारीच्या तिसर्या लाटे दरम्यान आयोजित केलेला आहे. कराचीतील नॅशनल स्टेडियमवर लीगचे सर्व सामने खेळले जात आहेत. या स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झालेली आहे. लीगमध्ये कराची किंग्ज आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात सामना झाला.
सदर सामना पाहण्यासाठी चाहते आपल्या मुलांसह कुटुंबासह कराचीतील नॅशनल स्टेडियमवर पोहोचले. यावेळी सुरक्षा रक्षकाने १२ वर्षांखालील मुलांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला नाही. त्यामुळे हजारो चाहते, सुरक्षा रक्षक आणि अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ सुरू झाला. याचा एक व्हिडिओ देखील सध्या व्हायरल होत आहे. ‘क्रिकेट के पागल’ असा हा मुलांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही मुले कराचीतील नॅशनल स्टेडियमबाहेर निदर्शने करताना दिसत आहेत. तसेच ते धरणे धरताना बसलेले दिसतात. इतकेच नव्हे तर पीएसएल व्यवस्थापनाविरोधात संताप व्यक्त करत आहेत आणि त्यांच्याविरोधात घोषणाही देत आहेत.
वास्तविक पाहता केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांनाच स्टेडियममध्ये प्रवेश दिला जात आहे तर १२ वर्षांखालील मुले या लसीसाठी पात्र नाहीत. त्यामुळे त्यांना प्रवेश देण्यात आला नाही, असे तेथील स्थानिक व्यवस्थापनाने सांगितले.
https://twitter.com/imransiddique89/status/1487085021672480771?s=20&t=npso1JNR4KIoVtrWjfHtCw
विरोधाचे कारण विचारले असता एका मुलाने सांगितले की, ‘त्यांनी आम्हाला आगाऊ लसीकरण करण्यास सांगितले नाही.’ दुसर्या मुलाने तक्रार केली की त्यांनी आम्हाला तिकिटे विकली, परंतु त्यांनी आम्हाला सांगितले नाही की केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांनाच स्टेडियममध्ये प्रवेश दिला जातो. तसेच या मुलांनी पुढे सांगितले की व्यवस्थापन आमच्या तिकिटाचे पैसे परत करत नाही, म्हणून आम्ही एक व्हिडिओ बनवत आहोत आणि व्हायरल करत आहोत जेणेकरून आम्हाला स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाईल. त्याचवेळी ही बाब समोर आल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) मुलांच्या तिकिटांचे पैसे परत करणार असल्याचे सांगितले.