इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणत्याही मोठ्या शहरांमध्ये राहण्यासाठी किंवा नव्यानेच नोकरीला आलेले कर्मचारी असो की शिक्षण घेण्यासाठी आलेले नवयुवक विद्यार्थी यांना स्वतःचे घर नसते. त्यामुळे त्यांना भाड्याच्या घरातच राहावे लागते. शहरातील मूळ रहीवासी असलेले अनेक नागरिक आपल्या रूम भाड्याने देतात. सहाजिकच घरमालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये काही वेळा स्नेहपूर्ण संबंध निर्माण होतात. परंतु काही वेळा भाडे म्हणजेच पैसे देण्यात घेण्यावरून वाद विवाद किंवा भांडण देखील होऊ शकते. हे भांडण काही वेळा पोलिस ठाण्यात देखील जाऊ शकते, दिल्ली मध्ये देखील असाच प्रकार झाला, परंतु त्याचे परिणाम खूप वाईट झाले. नवी दिल्लीतील संगम विहारमध्ये रात्री भाड्याची थकबाकी न दिल्याने एका घरमालकाने तरुणाची भोसकून हत्या केली. ३९ वर्षीय नीरज तिवारी असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नीरज तिवारी हा एका खासगी कंपनीत कामाला होता. तो पूर्वी गुर्जर चौक एच ब्लॉकजवळ आफताबच्या घरात भाड्याने राहत होता. महिनाभरापूर्वी तो आफताबचे घर सोडून दुसऱ्या ब्लॉकमध्ये राहू लागला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आफताबने रात्री नीरजला घरी बोलावून थकीत भाडे मागितले. नीरजने रुपये घेण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या आफताबने नीरजवर चाकूने वार केले. त्यानंतर जखमींना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नीरजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.