मुंबई – विकी कौशल आणि कतरिना कैफ विवाहबंधनात अडकल्यानंतर शुक्रवारी दुपारी जयपूरकडे रवाना झाले होते. या वेळी त्यांनी माध्यमांपासून लांब राहणेच पसंत केले. खासगी हेलिकॉप्टरने नवदांपत्य जयपूरला पोहोचले. त्यांचे कुटुंबीयही जयपूर विमानतळावर दिसून आले. माध्यमांच्या वृत्तानुसार, दोघे सध्या हनिमूनला परदेशात जाणार नाही. आधी ते त्यांची कामे पूर्ण करणार आहेत. त्यामुळे विकी आणि कतरिना दोघेही मुंबईत पोहोचल्याचे वृत्त आहे.
आलिशान अपार्टमेंट
लग्नानंतर विकी आणि कतरिना आपल्या नव्या घरात शिफ्ट होणार आहेत. त्यांच्या नव्या घराबद्दल चर्चा सुरू झाली आहे. जुहू येथे त्यांचे सी-फेसिंग अपार्टमेंट आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर विकी आणि कतरिनाच्या नव्या अपार्टमेंटच्या बाहेरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या अपार्टमेंटमधून समुद्राचे सुंदर दृष्य दिसत आहे. अपार्टमेंटच्या बाहेर निळे पडदे लावल्याचे दिसत आहे. नव्या जोडप्याच्या स्वागतासाठी मध्यरात्रीपर्यंत अपार्टमेंटचे काम सुरू होते.
अनुष्काच्या शुभेच्छा
विकी आणि कतरिना आता अनुष्का शर्मा-विराट कोहलीचे शेजारी होणार आहेत. अनुष्काने दोघांना शुभेच्छा देताना त्यांच्या घराचाही उल्लेख केला होता. अनुष्का लिहिते, सुंदर जोडप्याला खूप शुभेच्छा. आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी, प्रेम आणि एकमेकांना समजण्यासाठी शुभेच्छा. अखेर दोघांनीही लग्न केले. आता लवकरच नव्या घरात शिफ्ट व्हा जेणेकरून आम्हाला बांधकामाचा आवाज ऐकू येणे बंद होईल.
पाच वर्षांसाठी घराचा करार
विकी आणि कतरिनाने याच वर्षी जुलैमध्ये नवे घर घेतले होते. त्यांनी हे घर पाच वर्षांसाठी घेतले आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, घरासाठी त्यांनी १.७५ कोटी आगाऊ रक्कम जमा केली आहे. अपार्टमेंटचा ३६ महिन्यांचे भाडे ८ लाख रुपये प्रति महिना आहे. पुढील १२ महिने त्याचे भाडे ८.४० लाख प्रति महिना असेल. त्यानंतर इतर वर्षांचे भाडे ८.८२ लाख रुपये प्रति महिना असेल.