नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यापुढे राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास अतिशय सुखकर होणार आहे. कारण, महामार्गांलगत आता विविध प्रकारच्या सुविधा प्रवाशांना मिळणार आहेत. त्यामुळे प्रवासाचा आनंद वाढतानाच विविध सोयी-सुविधांमुळे प्रवाशांना मोठाच दिलासा मिळणार आहे. त्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंत राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर 600 पेक्षा जास्त ठिकाणी वेसाईड ॲमिनिटी (WSA), अर्थात रस्त्याच्या बाजूच्या असलेल्या सेवा मार्गांवर सुविधा विकसित करणार आहे. सध्या वापरात असलेल्या आणि यापुढे बांधल्या जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर दर 40-60 किमी अंतरावर वेसाइड सुविधा विकसित केल्या जातील.
यामध्ये प्रवाशांसाठी इंधन भरण्याचे स्थानक, इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधा, फूड कोर्ट, किरकोळ दुकाने, बँक एटीएम, चिल्ड्रन प्ले एरिया (लहान मुलांना खेळण्यासाठी सुविधा), वैद्यकीय दवाखाना, बालसंगोपन कक्ष, स्नानाची सुविधा असलेली प्रसाधनगृह, वाहन दुरुस्तीची सुविधा, वाहन चालकांसाठी विश्रांती स्थळ, स्थानिक हस्तकलेच्या जाहिरातीसाठी ‘व्हिलेज हाट’ यासारख्या सुविधा उपलब्ध केल्या जातील.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यापूर्वीच 160 ‘वेसाइड’सुविधांना विकासाची मान्यता दिली असून, यापैकी सुमारे 150 गेल्या दोन वर्षांत पुरस्कृत करण्यात आल्या आहेत. पुढील आर्थिक वर्षात आणखी 150 ‘वेसाइड’सुविधांना मान्यता देण्याचे नियोजन असून, यामध्ये अमृतसर-भटिंडा-जामनगर मार्गिका(कॉरिडॉर), दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग आणि दिल्ली-अमृतसर-कटरा द्रुतगती मार्ग यासारख्या हरित मार्गिका (ग्रीनफील्ड कॉरिडॉर) चा समावेश आहे. सध्या, ब्राउनफिल्ड आणि ग्रीनफिल्ड कॉरिडॉरमधील विविध ठिकाणच्या 75 वेसाइड सुविधा स्थळे www.etenders.gov.in या लिंक वर बोलीसाठी खुली आहेत. ही स्थळे एकूण आठ राज्यांमध्ये असून, राजस्थानमधील 27, मध्यप्रदेश 18, जम्मू आणि काश्मीर 9 आणि हिमाचल प्रदेशमधील 3 स्थळांचा यात समावेश आहे.
या वेसाइड ॲमिनिटी या सुविधा प्रवाशांसाठी महामार्गावरील प्रवास अधिक सोयीस्कर बनवण्याबरोबरच महामार्गाचा वापर करणाऱ्यांना आराम करण्यासाठी आणि खान-पानासाठी पुरेशा सुविधाही पुरवतील.
https://twitter.com/NHAI_Official/status/1630543455163129856?s=20
Various Wayside Amenities Along National Highways