इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे कोर्टात अचानक बिबट्या घुसला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली. कोर्टात उपस्थित असलेल्या अनेकांवर बिबट्याने प्राणघातक हल्ला करून जखमी केले. माहिती मिळताच पोलीस व वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अखेर तो जेरबंद झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याने सीजेएम कोर्टाच्या कार्यालय क्र.050-के समोरील बुट पॉलिश करणाऱ्यावर हल्ला केला आणि त्याला जखमी केले. त्यानंतक दुपारी ४ वाजेच्या सुमारास बिबट्याने अचानक कोर्टात प्रवेश केला. त्यानंतर पहिल्या मजल्यावरील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टाजवळ तो आला. बिबट्याला पाहताच संपूर्ण कोर्ट परिसरात मोठी खळबळ माजली. सर्व जण धावू लागले. या घटनेची माहिती पोलीस आयुक्त आणि वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर मोठा फौजफाटा तेथे दाखल झाला. सैरावैरा धावणाऱ्या बिबट्याने अनेक जणांना जखमी केले. अखेर काही तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद झाला. दरम्यान, जखमींना जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले.
Uttar Pradesh Leopard in Ghaziabad court