नाशिक : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यु.पी.एस.सी.) घेण्यात येणाऱ्या परिक्षेसाठी आजवर महाराष्ट्रातील केवळ मोजक्याच शहरांचा समावेश होता. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. दरम्यान खासदार हेंमत गोडसे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परिक्षा मंडळाकडे पाठपुरावा केल्याने नुकतेच युपीएससी परिक्षेसाठी नाशिक परिक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ऑक्टोबर २०२१ महिन्यातील नियोजित परिक्षेसाठी अर्ज दाखल करतांना आयोगाने आज परिक्षेच्या ऑनलाईन संकेतस्थळावर नाशिक शहराचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होणार असून त्यांना आता परिक्षार्थींना आयोगाच्या संकेतस्थळावर जावून नाशिक परिक्षा केंद्राची निवड करता येणार आहे.
नाशिक विभागातून दरवर्षी हजारोंच्या संख्येने परिक्षार्थी युपीएससीच्या परिक्षेसाठी प्रविष्ठ होत असतांना मात्र परिक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी त्यांना २०० ते ३०० किलोमीटरचे अंतर पार करुन परिक्षा केंद्र गाठावे लागत होते. यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी मोठी गैरसोय होत होती. नाशिक येथे परिक्षा केंद्र उपलब्ध करुन द्यावे, यासाठी गेल्या तीन वर्षांपासून परिक्षार्थीसह त्यांच्या शिष्ठमंडळांने खासदार गोडसे यांची भेट घेवून परिक्षा केंद्राविषयी आग्रही मागणी केली होती. परिक्षांर्थीची होणारी गैरसोयीची खा. गोडसे यांनी गंभीर दखल घेवून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या दिल्ली येथील कार्यालयात वेळोवेळी नाशिक परिक्षा केंद्रासाठी सततचा पाठपुरावा केला होता. या मागणीची दखल घेत नुकतेच गेल्या आठवड्यात आयोगाने देशात युपीएससी परिक्षेसाठी चार नवे परिक्षा केंद्र उपलब्ध करुन दिले असून यात महाराष्ट्रातील एकमेव नाशिक परिक्षा केंद्राचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील परिक्षांर्थीमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी प्रत्यक्ष खा. गोडसे यांची भेट घेवून आभार मानले.
दरम्यान आजपासून केंद्रीय लोकसेवा आयोगाने नाशिक येथे परिक्षा केंद्र प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. परिक्षार्थी, परिक्षा केंद्र आणि आयोग यांच्यातील नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी युपीएससी परिक्षेसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांसाठी आयोगाने एक विशेष परिपत्रक काढले असून संकेतस्थळावर नाशिक परिक्षा केंद्राची निवड करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार परिक्षार्थीनी संकेतस्थळाला भेट देत परिक्षा अर्जात फेरबदल करुन नाशिक केंद्राची निवड करावी, असे आवाहन खा. गोडसे यांनी केले आहे.
….