नवी दिल्ली – कार्यालयात काम करत असताना किंवा मीटिंगमध्ये असताना किंवा दुपारी आराम करत असताना अनेक कंपन्यांचे अनावश्यक कॉल किंवा मेसेज सर्वांनाच हैराण करत असतात. अनावश्यक कॉल्समुळे ग्राहक आणि कॉलर्सचे वादही होतात. दूरसंचार विभागाला (डीओटी) नागरिकांच्या तक्रारी मिळाल्यानंतर आता कठोर नियम तयार करण्यात आले आहेत. अनावश्यक कॉल किंवा एसएमएस पाठविणार्या कंपन्यांविरोधात विभागाने दंडाची तरतूद केली आहे, अशी माहिती विभागाच्या अधिकार्यांनी दिली आहे.
डीओटीतर्फे करण्यात आलेल्या नव्या तरतुदीनुसार, नियमांचे ५० दा उल्लंघन केल्यानंतर अशा कॉल्स आणि एसएमएससाठी १० हजार रुपयांचा दंड असेल. नियमांचे १० दा उल्लंघनासाठी प्रति उल्लंघन एक हजार रुपये, १० ते ५० उल्लंघनासाठी प्रति उल्लंघन ५ हजार रुपये आणि ५० हून अधिक वेळा उल्लंघन केल्यानंतर प्रति उल्लंघन दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.
वाणिज्यिक संचारामध्ये ग्राहक अधिमान नियमावली २०१८ नुसार, दंडाची तरतूद शून्य ते १००, १०० ते १ हजार रुपये अशी केली आहे. त्याशिवाय डीओटीच्या डिजिटल गोपनीय विभागाच्या उपकरणाच्या स्तरावरही नियमांचे उल्लंघन करण्याचा तपास केला जाणार आहे.
दंडाची नवी तरतूद
– ० ते १० उल्लंघनावर १ हजार रुपये दंड
– १० ते ५० उल्लंघनावर ५ हजार रुपये दंड
– ५० हून अधिक वेळा उल्लंघनावर १० हजार रुपये दंड
फास आवळण्यासाठी कठोर तरतुदी
पुनर्सत्यापनानंतर सर्व क्रमांक डिस्कनेक्ट करण्यात येणार आहेत. त्यांच्याशी निगडित आयएमईआयना संशयास्पद क्रमांकाच्या यादीत टाकले जाईल. संशयास्पद यादीत सहभागी आयएमईआयसाठी ३० दिवसांच्या कालावधीत कोणतेही कॉल, एसएमएस किंवा डाटाला (इंटरनेट) मंजुरी नसेल. संशयास्पद यादीत नोंदविलेले आयएमईआय क्रमांकांच्या उपकरणाचा वापर करून नव्या क्रमांकावरून हैराण करणार्या कॉलरच्या कोणत्याही कॉल, एसएमएस किंवा डाटाला पुनर्सत्यापन करण्यास सांगितले जाईल.
दोन वर्षापर्यंत बंदी
पुनर्सत्यापणानंतर हैराण करणार्या कॉलरचा क्रमांक सक्रिय होऊन पुन्हा नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास नव्या कनेक्शनचा वापर सहा महिन्यांसाठी प्रतिदिवस २० कॉल आणि २० एसएमएस पर्यंतच मर्यादित राहणार आहे. त्यानंतरही उल्लंघन कायम राहिल्यास दूरसंचार कनेक्शन खरेदीसाठी वापरात येणारे ओळखपत्र आणि पत्त्याच्या कागदपत्रांवर दोन वर्षांपर्यंत बंदी आणली जाणार आहे.
असे आहेत कठोर नियम
– कॉलच्या उल्लंघनाचा तपास दूरसंचार विभागाचा डिजिटल गोपनीय युनिट करणार
– संशयास्पद क्रमांकाच्या सत्यापनासाठी एक सिस्टिम जनरेटेड मेसेज पाठविला जाईल
– पुनर्सत्यापन करताना क्रमांक बंद केला जाईल.
– संबंधित आयएमआयला ग्रे यादीत टाकले जाईल
– अशा क्रमांकांवर ३० दिवसांपर्यंत मेसेज आणि कॉल करण्याची सुविधा नसेल
– ग्रे यादीत समावेश असलेल्या आयएमआय क्रमांकाचे मोबाईलचे दोनदा सत्यापन करावे लागेल
– सत्यापन केल्यानंतर नियमांचे उल्लंघन केल्यास मेसेजची संख्या कमी करण्यात येईल.
– अशा ग्राहकांना सहा महिन्यांपर्यंत जास्तीत जास्त २० मेसेजच पाठवता येतील
– त्यानंतरही उल्लंघन सुरूच राहिल्यास दोन वर्षांपर्यंत ब्लॉक केले जाईल.