इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोरोनामुळे अनेक देशांमध्ये प्रत्यक्षरीत्या शाळा बंद असून काही ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे, परंतु आता बहुतांश ठिकाणी परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने पुन्हा एकदा शाळा सुरु झाल्या आहेत, परंतु शैक्षणिक क्षेत्रात संबंधित वेगवेगळ्या बातम्या नेहमीच येत असतात. आता एक घटना ब्रिटनमधून समोर आली आहे. ओरडून शिकवते या कारणावरुन महिला प्राध्यापिकेला विद्यापीठातून काढून टाकण्यात आले. अखेर विद्यापीठाच्या या निर्णया विरोधात ती न्यायालयात पोहोचली. आणि न्यायालयाने तिच्या बाजूने निकाल दिला असून एक कोटी रुपयांची नुकसान भरपाईही मिळणार आहे.
एक्सेटर विद्यापीठातील येथे अॅनेट प्लॉट नावाच्या महिला प्राध्यापिकेने २९ वर्षे भौतिकशास्त्र शिकवले. पण एके दिवशी विद्यापीठाने तिला अचानक नोकरीवरून काढून टाकले. महिला प्राध्यापिकेने विद्यापीठाकडे कारण विचारले. विद्यापीठाने सांगितले की, तुमचा आवाज खूप मोठा होता. ओरडून शिकवण्याच्या सवयीमुळे नवीन विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते, असे विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने सांगितले.
विद्यापीठाच्या या निर्णया विरोधात प्राध्यापिका न्यायालयात गेली. तेव्हा या घटनेला ट्विस्ट आला. न्यायालयात, विद्यापीठ प्रशासनाने सांगितले की अॅनेट प्लॅटला तिच्या मोठ्या आवाजामुळे नाही, तर दोन पीएचडी विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केल्याबद्दल काढून टाकण्यात आले. सदर प्राध्यापिकेला यापूर्वी दोन वेळा निलंबित करण्यात आले आहे. तणावामुळे ती औषधे घेत आहे. शिवाय कोणाच्या समोर कसे बोलावे हे त्यांना कळत नाही, असाही आरोप करण्यात आला.
त्याचवेळी प्राध्यापिकेने न्यायालयास सांगितले की, तिचा आवाज सुरुवातीपासून असाच आहे. ती कधी जोरात बोलते ते कळत नाही. कुटुंबातील बहुतेक जण असेच मोठ्याने बोलतात. ती या आधी न्यूयॉर्क आणि जर्मनीमध्ये प्राध्यापिका होती. पण अशी तक्रार कधीच आली नाही. नोकरीवरून काढून टाकल्यानंतर मी नैराश्यातून जात आहे, असा युक्तीवाद प्राध्यापिकेने केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने विद्यापीठाला चांगलेच फटकारले. तसेच विद्यापीठ प्रशासनाने प्राध्यापिकेला एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेशही दिले. मात्र, आता या निर्णयाविरोधात हायकोर्टात दाद मागणार असल्याचे विद्यापीठ व्यवस्थापनाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.