मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वाधिक पाच वेळा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक विजेता बनण्याचा विक्रम करणाऱ्या भारतीय संघावर आता कौतुकांसह बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला आहे. भारतीय युवा संघाने शनिवारी रात्री एंटिगामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लडचा ४ गड्यांनी पराभव करून पाचव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. कर्णधार यश धुल याच्या नेतृत्वाखालील भारतीय युवा संघाने सर विवियन रिचर्ड्स मैदानात प्रथम गोलंदाजी करताना इंग्लंडला ४४.५ षटकांत १८९ धावांवर गारद केले. आणि नंतर ४७.४ षटकांत ६ गडी गमावून हे लक्ष्य पार केले. विजेतेपद पटकावल्यानंतर खेळाडूंवर आता बक्षिसांचा वर्षावर सुरू झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (बीसीसीआय) ने खेळाडूंसह संघातील सहकाऱ्यांनाही बक्षीस जाहीर केले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर ट्विट केले आहे.
ते म्हणाले, “१९ वर्षांखालील विश्वचषकात शानदार कामगिरी करून विजेतेपद पटकावणाऱ्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघातील सदस्यांना बीसीसीआयकडून ४०-४० लाख रुपये रोख आणि सपोर्ट स्टाफला प्रत्येकी २५ लाख रुपये देणार आहे. तुम्ही आमचा गौरव केला आहे”. माजी फलंदाज आणि एनसीए प्रमुख व्ही व्ही एस लक्ष्मणसुद्धा संघासोबत वेस्टइंडिज येथे गेले आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनीसुद्धा खेळाडूंना पुरस्कार देण्यासंदर्भात लिहिले, की “१९ वर्षांखालील खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि निवडकर्त्यांचे विश्वचषक जिंकल्याबद्दल अभिनंदन. आमच्याकडून ४० लाख रुपयांचा पुरस्कार हे त्यांच्या कौतुकाचे प्रतीक आहे. परंतु त्यांचे प्रयत्न याहून वरचे आहेत. शानदार कामगिरी”. भारताने यापूर्वी २००० साली मोहम्मद कैफ याच्या नेतृत्वाखाली, २००८ मध्ये विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली, २०१२ मध्ये उन्मुक्त चंद याच्या नेतृत्वाखाली आणि २०१८ मध्ये पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता.