मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या पाच दिवसांपासून देशभरातील साडेचार कोटी प्रेक्षकांच्या घरातील टीव्हीवरील चॅनेल्स बंद आहेत. ब्रॉडकास्टर आणि मल्टिसर्व्हिस ऑपरेटरमधील वादाचा फटका प्रेक्षकांना बसला आहे. केबलचालकांच्या वादामुळे ग्राहक मात्र वेठीस धरले गेले आहेत. त्यामुळे ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहेत. दरम्यान, ग्राहकांनी आता डीश टीव्ही घेण्याकडे आपला मोर्चा वळवला आहे.
ट्रायच्या नव्या दर आदेशाने वाढलेल्या किमतीनुसार नवीन करार न करणाऱ्या केबल ऑपरेटरांचे सिग्नल कापले आहेत. त्यामुळे देशातील ४.५ कोटी टीव्ही ग्राहकांच्या पॅकमधून डिस्नी स्टार, झी आणि सोनी यांसारख्या प्रमुख ब्रॉडकास्टर्सचे चॅनल्स गायब झालेत. केबल टेलिव्हिजन कंपन्यांची शिखर संस्था ‘ऑल इंडिया डिजिटल केबल फेडरेशन’ने (एआयडीसीएफ) सांगितले की, नव्या करारामुळे टीव्ही पाहण्याचा खर्च २५ ते ३५ टक्क्यांनी वाढून ग्राहकांवर बोजा पडेल, असे म्हणून केबल ऑपरेटरांनी नव्या दरासाठीच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यास नकार दिला आहे.
१५ टक्के दरवाढ एनटीओ ३० अन्वये ४ वर्षांनंतर लोकप्रिय चॅनलांच्या दरांत १५ टक्के वाढ झाली आहे. ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल फाउंडेशन’ने (आयबीडीएफ) म्हटले की, ८० टक्के ऑपरेटरांनी नव्या करारावर स्वाक्षया केल्या आहेत. २० टक्के ऑपरेटर स्वाक्षऱ्यांसाठी तयार नाहीत. ट्रायने जारी केलेल्या ‘नवीन दर आदेश ३.० नुसार इंटरकनेक्ट ऑफरवर स्वाक्षऱ्या करण्यासाठी एआयडीसीएफने केबल ऑपरेटर व मल्टी सिस्टम ऑपरेटरांना नोटिसा बजावल्या होत्या. त्याकडे अनेक ऑपरेटरांनी दुर्लक्ष केले आहे.
असा आहे वाद
ऑल इंडिया डिजिटल केबल फेडरेशन ही एमएसओ (मल्टिसर्व्हिस ऑपरेटर्स), केबल ऑपरेटर्सची शिखर संघटना आहे. तर इंडियन ब्रॉडकास्टिंग अॅण्ड डिजिटल फाउंडेशन ही दूरचित्रवाहिन्या प्रसारकांची शिखर संघटना आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) एनटीओ ३.० म्हणजेच नवीन दररचनेला (न्यू टॅरिफ ऑर्डर) संमती दिली आहे. त्यानुसार वाहिन्यांच्या गुच्छांचा (पॅकेज) दर १२ रुपयांवरून १९ रुपये इतका वाढविण्यात आला आहे. झी, स्टार व सोनी या वाहिनी गुच्छांच्या दरात त्यामुळे वाढ झाली आहे. या वाढीव दरांचा भरणा करण्यास मल्टिसर्व्हिस ऑपरेटर्सनी विरोध केल्यामुळे त्यांनी प्रसारण बंद केले आहे.
TV Channels Crore Cable Customer Dispute