सोलापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिरात भाविकांनी अर्पण केलेले सोने-चांदी वितळवण्याचा निर्णय होऊन त्यासाठी एक समितीही गठित करण्यात आली आहे; मात्र श्री तुळजाभवानी देवीचा खजिना आणि जमादार खान्यातील अतिप्राचीन, ऐतिहासिक अन् पुरातन सोन्या चांदीच्या वस्तू, मौल्यवान अलंकार, प्राचीन नाणी यांचा अपहार झाल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे
. या प्रकरणामध्ये राजे-महाराजेंनी देवीला अर्पण केलेली ऐतिहासिक आणि पुरातन 71 नाणी गायब झाली आहेत. देवीचे 2 चांदीचे खडाव जोड आणि माणिक गायब आहेत. या प्रकरणी चौकशी समितीने ठपका ठेवलेल्या दोषींवर अद्याप कारवाई झालेली नाही. या प्रकरणात ठपका ठेवण्यात आलेल्या दोषींवर गुन्हे दाखल करून चौकशी पूर्ण करण्याची मागणी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे यांनी केली आहे.
श्री तुळजाभवानी देवीला अर्पण आलेले सोने-चांदी वितळवणे म्हणजे अपहार प्रकरणातील गौडबंगाल लपवण्याचा तर प्रयत्न नाही ना, याची चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामुळे अपहार प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत मंदिरातील सोने-चांदी वितळवण्याच्या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले की, श्री तुळजाभवानी देवीची प्राचीन 71 नाणी गायब झालेल्या प्रकरणात 1 महंत, 3 तत्कालीन अधिकारी आणि 2 धार्मिक व्यवस्थापक यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक श्री. दीक्षित यांचे वर्ष 2001 मध्ये निधन झाले. त्यानंतर कोणतीही कायदेशीर प्रक्रीया न करता तत्कालीन सर्व अधिकार्यांनी त्यांच्या घरातून किल्ल्या आणून त्याचा वापर चालू केला. हे बेकायदेशीर कृत्य वर्ष 2001 ते 2005 या कालावधीत झालेले आहे.
श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात भाविक श्रद्धेने दान देत असतात. त्या प्रत्येक दागिन्यांचा हिशोब चोख रहाणे, तसेच त्याच्या नोंदी असणे आवश्यक आहे. सोने-चांदी वितळवण्याच्या प्रक्रियेत संबंधित दोषींचा अपहार दडपण्याचा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत मंदिरातील सोने-चांदी वितळवण्यात येऊ नये.
Tuljabhavani Temple Gold Silver Coins