पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गाडी चालवताना आपण फोनवर बोलत असल्याचे वाहतूक पोलीस लगेच आपल्याला थांबवून दंड भरायला लावतो! परंतु आता यापुढे गाडी चालवताना तुम्ही फोनवर बोलू शकता! होय, वाहतुकीच्या नियमांनुसार, असे केल्याने कोणताही वाहतूक पोलिस तुमचे चालान कापू शकत नाही. इतके नव्हे जर त्याने तसे केले तर तुम्ही त्याला न्यायालयात आव्हान देऊ शकता. परंतु नियमांनुसार, असे करताना तुम्हाला देखील काही नियम पाळावे लागतील. जर ड्रायव्हर गाडी चालवताना हँड्सफ्री कम्युनिकेशन फीचर वापरून फोनवर बोलत असेल, तर तो दंडनीय गुन्हा मानला जाणार नाही. यासाठी चालकाला कोणताही दंड भरावा लागणार नाही. मात्र प्रत्यक्ष एका हातात मोबाईल घेऊन बोलता येणार नाही अशी माहिती खुद्द रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
खासदार ईडन यांनी विचारले होते की, मोटर वाहन (सुधारणा) कायदा अंतर्गत मोटार वाहनांमध्ये हँड्सफ्री कम्युनिकेशन (मोबाईल) वापरण्यासाठी दंडाची तरतूद आहे का? यावर गडकरी म्हणाले की, मोटार वाहन (सुधारणा) कायदा, 2019 चे कलम 184 (c) मोटार वाहन चालवताना हाताने पकडलेल्या दळणवळणाच्या साधनांचा वापर केल्यास शिक्षेची तरतूद आहे. वाहनात हँडफ्री कम्युनिकेशन उपकरणे वापरल्यास कोणताही दंड आकारला जात नाही. तसेच नवीन मोटार वाहन कायद्यानुसार, दुचाकी वाहनांवर चार वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाची तिसरा प्रवासी (ट्रिपल सीट) म्हणून गणना केली जाईल. अशा परिस्थितीत जर आपण, मुलगा आणि पत्नीसह दुचाकीवर बसणार असाल आणि मुलाचे वय चार वर्षांपेक्षा जास्त असेल तर नियमाचे उल्लंघन केल्यास 1000 रुपयांचे चलन कापले जाऊ शकते. याशिवाय हेल्मेट न वापरणाऱ्यांना 1000 रुपयांचा दंड होऊ शकतो आणि तुमचे ड्रायव्हिंग लायसन्सही मोटार वाहन कायद्याच्या कलम 194C अंतर्गत तीन महिन्यांसाठी अपात्र ठरू शकतो. त्यामुळे दुचाकी असो की चारचाकी, वाहन चालवतांना वाहतुकीचे नियम समजून घेणे आवश्यक ठरते.