मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील डान्सिंग क्विन, कोट्यवधी तरुणांच्या गळ्यातील ताईत आणि धकधक गर्ल नावाने ओळखल्या जाणा-या अभिनेत्री माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस. १५ मे १९६७ ला मुंबईमध्ये जन्म झालेली माधुरी आज आपला ५४ वा वाढदिवस साजरा करत आहे. भारतीय चित्रपटसृष्टित अनेक वर्षांपासून सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजविणा-या माधुरी दीक्षितची जादू अजूनही कायम आहे. चित्रपट क्षेत्रात आजही ती सक्रिय आहे.
पुरस्कारांचा वर्षाव
पद्मश्री पुरस्कारासह एक डझनाच्यावर प्रतिष्ठीत पुरस्कारांनी तिला सन्मानित करण्यात आले आहे. फिल्मफेअर पुरस्कारासाठी जवळपास १४ वेळा नामांकन मिळवून त्यात चार वेळा पुरस्कार प्राप्त करणारी ती एकमेव अभिनेत्री आहे. तिच्या खासगी आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, तिची प्रेमकहाणी कोणत्याही चित्रपटाच्या कथेला शोभेल अशीच आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांच्या प्रेमाची कथा सांगणार आहोत.
या चित्रपटापासून प्रारंभ
कोट्यवधी मनावर अधिराज्य गाजविणारी माधुरी दीक्षितने तिचे करिअर टॉपवर असताना डॉ. श्रीराम नेने यांच्याशी विवाह केला. विवाह करण्याचा तिचा निर्णय सर्वच चाहत्यांसाठी धक्कादायक होता. केवळ १७ व्या वर्षी तिने राजश्री प्रोडक्शनच्या अबोध चित्रपटापासून आपल्या चित्रपट कारकीर्दीला सुरुवात केली. परंतु हा चित्रपट चालला नाही. त्यामुळे तिने पुन्हा आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. परंतु माधुरीने नंतर एकच नव्हे, तर अनेक चित्रपट गाजविले. त्यानंतर ती बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेत्री झाली.
येथे भेटली नेने यांना
डॉ. श्रीराम नेने यांच्या प्रेमात पागल झाल्यानंतर माधुरीने सर्व सोडून त्यांच्यासोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला. १७ ऑक्टोबर १९९९ ला ती विवाहाच्या बंधनात अडकली. माधुरीने एका मुलाखतीत तिची प्रेमकहाणी सांगितली होती. डॉ. नेने यांच्याशी लॉस अँजेलिस येथे तिच्या भावाच्या पार्टीत पहिली भेट योगायोगाने झाल्याचे माधुरी सांगते. ती अभिनेत्री आहे आणि हिंदी चित्रपट क्षेत्रात काम करते हे डॉ. नेने यांना अजिबात माहिती नव्हते. हे ऐकून ती आश्चर्यचकित झाली होती. त्यांंना याबाबत काहीच माहिती नव्हते.
बाईक राईडचा अनुभव
पहिल्या भेटीनंतर श्रीराम नेने यांनी तिला पहाडावर बाइक रायडिंगसाठी येणार का असे विचारले होते. पहाड आणि बाइक आहे असे ऐकल्यावर तिला चांगले वाटले. परंतु पहाडावर गेल्यानंतर ही रायडिंग अवघड असल्याचा अंदाज माधुरीला आला. त्यानंतरच नेने आणि ती एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांचे प्रेम बहरले. एकमेकांना काही दिवस डेट केल्यानंतर त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. आता या दांपत्याला रियान आणि अॅरिन हे दोन मुले असून, नेने कुटुंब आनंदात नांदत आहे.