विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोनामुळे सर्वच राज्यांपासून दूर राहिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आता प्रत्येक महिन्यात उत्तर प्रदेशात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यांच्या या कृतीला निवडणुकीशी जोडले जात आहे हे जगजाहीर आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान स्वतः आपला लोकसभा मतदार क्षेत्र वाराणसीसह इतर भागातील विकासकामांचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यापैकी कोणी ना कोणी पंधरा दिवसांतून उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असल्याचा स्वच्छ संदेश यातून दिला जाणार आहे.
गेल्या महिन्यात राष्ट्रीय संघटना महासचिव बी. एल. संतोष आणि प्रदेश प्रभारी राधामोहन सिंह यांनी लखनऊचा दौरा करून मंत्र्यांच्या कामाचा आढाव घेतला होता. ते सोमवारी पुन्हा लखनऊमध्ये पोहोचणार असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पक्षातील इतर नेत्यांशी चर्चा करून पंतप्रधान तसेच इतर ज्येष्ठ नेत्यांच्या दौ-यासंदर्भात चर्चा करणार आहेत.
गेल्या चार-पाच महिन्यांमध्ये कोरोनामुळे अनेक गैरसमज पसरविण्यात आले आहेत. काही ठिकाणी पक्षाचे नेतेही निष्क्रिय होते. परंतु नेत्यांनी बाहेर पडावे आणि लोकांच्या समस्या ऐकून घ्याव्यात, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. राज्यातील मत्र्यांसह नेत्यांनी आपापल्या क्षेत्रांमधील गल्लोगल्लीत दौरा करण्याचे निर्देश आधीच देण्यात आले होते. या दौ-यात लोकांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या समस्या ऐकाव्यात. तथ्यांसह त्यांना समजवण्याचा प्रयत्न करावा. जर चूक झाली असेल तर ती स्वीकारावी. जुलैपर्यंत दौरे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जुलैपासून दौरे अपेक्षित
जुलैपासून पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रातील ज्येष्ठ नेते मैदानात उतरण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ मोठे नेते आहेच. परंतु पंतप्रधानांच्या दौ-यांमुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण होण्यास मदत मिळणार आहे. त्यांचे बहुतांश दौरे सरकारीच असतील. त्यामध्ये ते आढावा घेत राहतील. परंतु मधूनमधून कार्यकर्त्यांशीसुद्धा संवाद साधणार आहेत. लसीकरण जनजागृतीसाठी सर्व कार्यक्रम सुरू राहतील. राजकीय सभेचा कोणताही प्रस्ताव नाही. अमित शहा आणि नड्डा यांचे दौरे पक्षसंघटनेशी निगडित असतील. प्रत्येक आठवड्यात प्रत्येक केंद्रीय मंत्र्यांचा उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यात दौरा प्रस्तावित असेल. प्रदेश संघटनेच्या नेत्यांशी चर्चा करून दौ-यांना अंतिम स्वरूप देण्यात येईल.