विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना संसर्ग झाल्यानंतर उद्भवणा-या समस्या सर्वांनी ऐकलेल्या किंवा अनुभवलेल्या आहेत. परंतु कोरोनापश्चात म्हणजेच कोरोना होऊन गेलेल्या लोकांना आता वेगवेगळ्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे अशा लोकांना चव आणि गंधाच्या विचित्र समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशा लोकांना अन्न खातानाची चव आणि वास रसायनयुक्त किंवा सडल्यासारखा येऊ लागला आहे.
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये आढळणा-या अशा स्थितीला डॉक्टरांच्या भाषेत पारोस्मिया असे म्हणतात. यात वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम दिसून येतो. वस्तू सुगंधी आहे की दुर्गंधीत आहे हे ओळखण्यात संबंधित रुग्ण अपयशी ठरतो. काही लोकांना प्रत्येक पदार्थ किंवा वस्तूतून एक वेगळाच विचित्र गंध येत असतो. या रोगाला फँटोस्मिया असे म्हणतात.
ही समस्या का निर्माण झाली
बीएचयूचे न्यूरोलॉजी विभागाचे के. प्रो. विजयनाथ मिश्रा सांगतात, पारोस्मिया होण्याचे एक कारण म्हणजे सर्दी किंवा विषाणूमुळे ओलफॅक्ट्री (वास घेण्याची क्षमता) नुकसान पोहोचते. श्वसन तंत्राच्या वरच्या भागात संसर्गामुळे ओलफॅक्ट्री न्यूरॉन्सना नुकसान पोहोचते. ज्येष्ठ नागरिकांना ही समस्या जास्त उद्भवते. सिगारेट पिणा-या लोकांनासुद्धा हा आजार होऊ शकतो. कोरोना महामारीत ही समस्या लक्षण झाली आहे.
वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम
कोरोनामुळे चव आणि वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होत असल्याचा दावा करणा-या ब्रिटिश रायनोलॉजिकल सोसायटीचे के क्लेअर हॉपकिन्स सांगतात, कोरोनामुळे पारोस्मियाने बाधित लोक बरे होऊ लागले आहेत. वास घेण्याची क्षमतासुद्धा पुन्हा येऊ लागली आहे. परंतु त्याला वेळ लागत आहे. विषाणूमुळे किंवा संसर्गामुळे मस्तिष्कातील वास घेण्याचे तंत्र प्रभावित होते त्यामुळे ही समस्या निर्माण होते.
अचानक सिगरेटमधून दुर्गंध
न्यूजर्सीच्या मोनिका फ्रँकलिन यांना एप्रिल २०२० मध्ये कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांच्या श्वसन तंत्रावर परिणाम झाला. दोन महिन्यांनंतर त्यांना पारोस्मियासह फँटोस्मिया झाल्याचे कळले. संसर्गाच्या दोन महिन्यांनतरही मोनिका यांना आसपास कोणीही सिगरेट पित नसतानाही सिगरेटचा दुर्गंध जाणवू लागला. या आजाराने बाधित लोकांना आसपास त्या वस्तू नसतांनाही त्या वस्तूंचा सुगंध किंवा दुर्गंध जाणवू लागतो