शिमला (हिमाचल प्रदेश) – कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून गेल्या दीड वर्षापासून देशातील सगळेच लोक आपापल्या घरात कैद झालेले आहेत. महामारीची दुसरी लाट ओसरताच राज्यांमध्ये लॉकडाउन शिथिल करण्यात आले. परिणामी पर्यटक घराबाहेर पडू लागले आहेत. प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. वीकेंडसाठी शिमल्यामध्ये पर्यटकांची एकच गर्दी झाल्याने कोरोना विषाणूचा नायनाट झाला की काय अशीच परिस्थितीत दिसून आली.
हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे वीकेंडसाठी पर्यटकांनी एकच गर्दी केल्याने शहरातील हॉटेलमध्ये ७० ते ९० टक्के बेड बुक झाले आहेत. काही हॉटेल शंभर टक्के फुल झाले आहेत. पुढील आठवड्यातील वीकेंडसाठी आतापासूनच ५० टक्क्यांपर्यंत बुकिंग झाली आहे.
प्रवाशांच्या गर्दीमुळे येथील सर्वात मोठी लिफ्ट कार पार्किंग शनिवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत फुल झाली होती. त्यानंतर संचालकांना पार्किंगसाठी प्रवेश बंद करावे लागले. येथील प्रसिद्ध रिज मैदान आणि माल रोड पर्यटकांच्या गर्दीने फुलले होते. शिमल्याशिवाय मशोबरा, नालदेहरा, कुफरी आणि नारकंडा येथेही पर्यटक पोहोचले होते.
ई-पासच्या अप्रूव्हलसाठी समस्या
शिमल्यात येण्यासाठी ई-पास अप्रूव्हल करण्यामध्ये अनेक समस्या येत असल्याचे शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले. अनेक वेळा दोन ते तीन दिवसांमध्ये ई-पास अप्रूव्ह होत आहेत. ई-पास अप्रूव्ह न झाल्याने अनेक पर्यटकांना हॉटेलची अॅडव्हान्स बुकिंग रद्द करावी लागली आहे.
३६ तासात आठ हजार वाहनांचा प्रवेश
गेल्या ३६ तासात शहराचे प्रवेशद्वार शोघी बॅरियरमधून जवळपास ८००० वाहनांनी शहरात प्रवेश केला आहे. शुक्रवारी (१८ जून) सकाळी ८ वाजेपासून सायंकाळी ८ वाजेपर्यंत ३८२८ वाहने शिमल्यात आली आहेत. रात्री ८ ते सकाळी ८ वाजदरम्यान ३२६ वाहने आणि शनिवारी सकाळी ८ वाजेपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत ३८३६ वाहनांनी शहरात प्रवेश केला आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे अधिकारी अजय भारद्वाज यांनी दिली.