विशेष प्रतिनिधी, मुंबई
नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायी बातमी आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)ने मोठी घोषणा केली आहे. या वर्षभरात टीसीएस कॅम्पस सिलेक्शनला अधिकाधिक चालना देणार आहे. याद्वारे कंपनी तब्बल ४० हजार जागा भरणार आहे. त्यामुळे खासकरुन इंजिनिअरिंगच्या अखेरच्या वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या दीड ते दोन वर्षापासून केवळ शाळा व कनिष्ठ महाविद्यालय नव्हे तर उच्च शैक्षणिक संस्था आणि अनेक विद्यापीठ देखील बंद आहेत. त्यामुळे तरुणांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून बेरोजगारी वाढत आहेत. अनेक उच्चशिक्षित तरुणांना नोकऱ्या नसल्याने नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर टीसीएसने एक सुखदवार्ता जाहीर केली आहे. येत्या वर्षभरात टीसीएसकडून सुमारे ४० हजार नोकर्या उपलब्ध होतील, असे टीसीएसने जाहिर केले आहे.










