इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – झारखंडमधील निलंबित आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्याविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आणखी एक मोठी कारवाई केली आहे. ईडीने पूजा सिंघल यांच्यासह त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या ठिकाणांवर पुन्हा छापेमारी सुरू केली आहे. रांची आणि मुजफ्फरपूरमध्ये आज सकाळी साडेसात वाजता ईडीच्या पथकाने छापेमारी कारवाई सुरू केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीकडून आता अनिल झा नावाच्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. अनिल झा याचे अधिकारी आणि राजकीय व्यक्तींशी चांगले संबंध आहेत. पैशांच्या देवाणघेवाणीमध्ये अनिल झा याने महत्त्वाची भूमिका निभावली आहे, असे बोलले जात आहे. अनिल झा ही व्यक्ती पैसे पोहोचवण्याचे काम करायची. या नव्या पात्राने पूजा सिंघल यांच्या प्रकरणात काय काय केले आहे, याची ईडीला खात्री करायची आहे.
मुजफ्फरपूरच्या मिठनपुरा येथे पूजा सिंघल यांचे पती अभिषेक झा यांचे वडील कामेश्वर झा यांचे घर आहे. कामेश्वर झा हे मुजफ्फरपूरमध्ये बिहार प्रशासनिक सेवेत अधिकारी म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते. झारखंड हे नवे राज्य स्थापन झाल्यानंतर ते झारखंडमध्ये आले. ते रांचीसह दुमका येथे सक्रिय झाले होते. अनिल झा ही व्यक्ती कामेश्वर झा यांचा माणूस आहे असे बोलले जात आहे. त्यामुळे ईडीने मुजफ्फरपूर येथील कामेश्वर झा यांच्या घरावर छापेमारी केली आहे.
मनी लाँड्रिंग आणि मनरेगा घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पूजा सिंघल, पती अभिषेक झा आणि त्यांचा सीए सुमन सिंह सध्या कारागृहात कैद आहे. सुमन सिंह याच्या ठिकाणांवर केलेल्या छापेमारीत १९.४१ कोटी रुपयांची रक्कम आढळली होती. अभिषेक झा यांच्या पल्स रुग्णालयात शेल कंपन्यांचे पैसे लावण्यात आल्याचा आरोप आहे.
जिल्ह्यांमध्ये उपायुक्त असताना झालेल्या मनरेगा घोटाळा प्रकरणात पूजा सिंघल यांची चौकशी सुरू आहे. झारखंडच्या खाण सचिव असताना पूजा सिंघल यांच्यावर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना लाभ मिळवून देण्याचा आणि उत्खनन लीज देण्याचा आरोप आहे. पूजा सिंघल यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून त्यांचे पती अभिषेक झा आणि सासरे कामेश्वर झा यांनी मोठ्या प्रमाणात पैसे उभे केले.