मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुर्ला येथील एका हॉटेलमध्ये शारीरिक संबंध ठेवताना एका ६१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. घटनेची माहिती कळताच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीस रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच त्या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला येथील एलबीएस रोडवर जीएसके नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये सोमवारी सकाळी ६१ वर्षीय पुरुष आणि त्याची ४० वर्षीय प्रेयसीने चेक इन केले होते. हॉटेलमध्ये आल्यानंतर दोघांनी शारीरिक संबंधांना प्रारंभ केला. त्याचवेळी पुरुषाला अचानक अस्वस्थ वाटू लागले. तसेच हा पुरुष काही वेळाने बेशुद्ध झाला. सोबत असलेल्या महिलेने याबद्दल हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना तातडीने कळविले. संबंधितांनी बेशुद्ध पुरुषाला सायन रुग्णालयात हलविले. परंतु त्यापूर्वीच पुरुषाचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी चौकशी केली असता, पुरुषासोबत आलेली महिला वरळी येथील कोळीवाड्यात राहणारी असून, ती एका खासगी कंपनीत कामाला आहे. पुरुषाच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळून आल्या नाहीत. पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असून, या अहवालातून पुरुषाच्या मृत्यूचे गूढ उलगडणार आहे.