इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागून करण्यात आल्याची घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली. २०२५-२६ या वर्षापासून सीबीएससी पॅटर्न लागून होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर आता त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.
राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई अभ्यासक्रमाला सुकाणू समितीने मान्यता दिली का? असा प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी विचारला होता. त्यावर, सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध करुन दिली जाणार असून १ एप्रिलपासून सत्राची सुरुवात करण्यात येणार असल्याचे उत्तर दादा भुसे यांनी दिले.
त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यावर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज्यात सीबीएसई पॅटर्न लागू करण्याची घोषणा केली. राज्याला अतिशय उज्ज्वल शिक्षण परंपरा आहे. पण तिच्याकडे दुर्लक्ष करुन इतर बोर्डाचे अनुकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला ही अतिशय खेदजनक बाब आहे. या माध्यमातून राज्याचा एसएससी बोर्ड पुर्णतः बंद करण्याचा डाव या सरकारने आखला आहे असे दिसते. संत, सुधारक आणि शिक्षणाची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राची ओळख या निर्णयामुळे पुसणार तर नाही ना अशी शंका वाटते. हा निर्णय अभिजात भाषा मराठी, संस्कृती आणि परंपरेला मारक ठरणार आहे. माझी राज्य सरकारला नम्र विनंती आहे की कृपया आपण या निर्णयाचा फेरविचार करावा.