नवी दिल्ली – कोणाचा मुलगा किंवा मुलगी असणे यावर न्यायालयातील प्रतिष्ठा ठरत नाही. वकील म्हणून तुमची क्षमता किती, तुम्ही कशाप्रकारे युक्तिवाद करता. यावर तुमची प्रतिष्ठा बनते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाचे न्यायाधीश आपल्या समोर उभे राहणार्या वकिलांच्या वंशावळीवर प्रभावित होत नाहीत, असे न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायाधीश एम. आर. शाह यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
न्यायालय म्हणाले की, खटल्याची तयारी आणि युक्तिवाद कसा केला, यावर वकिलांचा सन्मान अवलंबून असतो. तुम्ही कोणाचा मुलगा किंवा मुलगी आहात यावरून न्यायालयातील प्रतिष्ठा ठरत नसते. तर तुम्ही वाद-प्रतिवादाची तयारी कशी केली आहे यावरून ठरते, असे न्यायाधीश चंद्रचूड म्हणाले. तुम्ही कोण आहात आणि वकिलाच्या रूपात तुम्ही किती सिद्ध आहात, हे दाखवूनच तुम्ही न्यायाधीशांचा सन्मान मिळवू शकतात.
चांगल्या पद्धतीने तयारी करून आलेल्या वकिलांना न्यायाधीश नेहमीच लक्षात ठेवतात. भविष्यात चांगली संधी मिळविणार्या वकिलांचा सुद्धा ते सन्मान करतात. तथ्य जाणून घेण्यासाठी न्यायालयात येणार्या युवा वकिलांचाही न्यायाधीश सन्मान करतात.
वरिष्ठ वकील दुसर्या खटल्यांमध्ये व्यग्र आहेत या कारणामुळे एका प्रकरणाला स्थगिती मिळावी, अशी मागणी कनिष्ठ वकिलाने केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हे मत व्यक्त केले आहे. प्रकरण स्थगित करण्याऐवजी युवा वकिलाला युक्तिवाद सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.
न्यायाधीश शाह युवा वकिलाला म्हणाले, तुम्हाला कमीत कमी प्रकरणाचा युक्तिवाद सुरू करायला हवा. व्यक्तीने कधीही स्थगन वकील म्हणून काम करू नये. तुम्हाला करिअर अशा प्रकारे घडवायचे आहे असे नाही. पण तुम्ही एखाद्या प्रकरणाचा युक्तिवाद करू शकले नाही तर वकिलाची किमया कशी शिकणार?
न्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, आम्ही नाराज नाही आहोत. आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहोत. जेव्हा कधी तुम्ही कोणत्याही न्यायाधीशांसमोर उभे राहताल तर कोणत्याही प्रकरणाचा युक्तिवाद करण्यासाठी नेहमीच सिद्ध असायला पाहिजे. न्यायाधीशांच्या मनात तुमच्या प्रति सन्मान जागृत होईल. अशा प्रकारे तुमची प्रतिष्ठा वाढत जाईल. या वेळी न्यायाधीशांनी युवा वकिलांसमोर आपले अनुभव कथन केले.