काबूल – अफगाणिस्तानातील अंतरिम सरकारबाबत तुम्हाला बर्यापैकी माहिती झाली असेल. पंतप्रधान, उपपंतप्रधान, गृहमंत्री आणि कॅबिनेटचे १४ सदस्य संयुक्त राष्ट्रांच्या काळ्या यादीतील कुख्यात दहशतवादी आहेत, हेसुद्धा तुम्हाला ठाऊक असेल. अफगाणिस्तानची अर्थव्यवस्थासुद्धा बंदुकधारी दहशतवादी पाहणार आहे. `दा अफगाणिस्तान बँक` (DAB) चे प्रमुख हाजी मोहम्मद इद्रिसचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये तो कार्यालयात बसून लॅपटॉपवर काम करताना तसेच त्याच्या बाजूला एक-४७ दिसत आहे.
हाजी मोहम्मद इद्रिसची डीएबीच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्याची घोषणा तालिबानचा प्रवक्ता जबिहुल्लाह मुजाहिदने नुकतीच केली होती. भारताच्या रिझर्व्ह बँकेप्रमाणेच डीएबी ही अफगाणिस्तानातील केंद्रीय बँक आहे. बँकिंग क्षेत्रासह तिच्या धोरणांवर अर्थव्यवस्थाही अवलंबून आहे. हाजी मोहम्मद इद्रिस अफगाणिस्तानच्या जौजान येथील रहिवासी असून, तो तालिबानच्या आर्थिक आयोगाच्या प्रमुखपदीही होता.
बंदुकधारी अर्थतज्ज्ञ
एक बंदुकधारी अर्थतज्ज्ञ अफगाणिस्तानमधील बँकिंग क्षेत्र आणि अर्थव्यवस्थेला कसे सांभाळेल हे येणारा काळच सांगेल. सध्या तालिबानसमोर मोठे आर्थिक संकट आहे. चीन आणि पाकिस्तानला वहळल्यास बहुतांश देशांनी अफगाणिस्तानला आर्थिक मदत देणे बंद केले आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्यानंतरच अनेक बँका बंद आहेत. नागरिकांना रोख रकमेचा तुटवडा जाणवत आहे. आवश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत असल्याने महागाई गगनाला भिडली आहे.