मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय क्रिकट संघाचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. गावस्कर यांना आयपीएल समालोचनातून हटविण्याची मागणी करण्यात येत आहे. राजस्थान रॉयल्सचा स्फोटक फलंदाज शिमरन हेटमायर याच्या पत्नीबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून ते टीकाकारांच्या निशाण्यावर आले आहेत.
आयपीएलमध्ये शुक्रवारी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना झाला. या सामन्यात चेन्नईने पहिली फलंदाजी करत ६ गड्यांच्या मोबदल्यात १५० धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना राजस्थानची चांगली सुरुवात झाली. परंतु नंतर आरआर चेन्नईच्या गोलंदाजांच्या जाळ्यात फसत गेली. यादरम्यान वेस्टइंडिजचा स्फोटक फलंदाज शिमरन हेटमायर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. हेटमायर क्रिझवर आल्यावर गावस्कर यांनी वक्तव्य केले, ज्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार होऊ लागला आहे.
हेटमायर आपल्या पहिली आपत्यप्राप्ती झाल्यानंतर तो मायदेशी परतला होता. त्यामुळे तो राजस्थानसाठी काही सामने खेळू शकला नव्हता. परंतु चेन्नईविरुद्ध त्याचा अकरा खेळाडूंमध्ये समावेश झाला आणि तो मैदानात परतला. हेटमायर राजस्थानच्या डावात १५ व्या षटकात फलंदाजीसाठी आला होता. त्यादरम्यान गावस्कर इंग्रजीत समालोचन करत होते. हेटमायर क्रिझवर येताच गावस्कर म्हणाले, “शिमरन हेटमायर याच्या पत्नीची प्रसूती झाली आहे. आता हेटमायर राजस्थानसाठी प्रसूत होईल का?”
दरम्यान, गावस्कर यांच्या असभ्य टिप्पणीवरून चाहते सोशल मीडियावर गावस्कर यांना चांगलेच फटकारत असून त्यांच्यावर टीका करत आहेत. त्यांना समालोचनातून हटवावे अशी मागणी काही युजर्सनी केली. गावस्कर यांनी यापूर्वी आयपीएल २०२० मध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यावर टिप्पणी केली होती. त्या वेळी सुद्धा त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला होता.