माळरानावर फुलले नंदनवन…!
शेततळे ठरला विकासाचा दुवा
क्षारयुक्त व खडकाळ जमीन, काटेकुटे, बाभूळाचं सर्वत्र साम्राज्य… असे एकेकाळी वीस एकर शेतीवरील चित्र होते. आज मात्र या शेतावर ऊस, मका व कापूस पीक डौलानं ऊभं आहे. कोपरगांव तालुक्यातील वारी गावातील शेतकरी गोरख शंकरराव टेके-पाटील यांच्या शेतात ही किमया साधली गेली आहे. ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना माझ्या विकासाला दुवा ठरली आहे. अशी भावना गोरख टेके-पाटील यांनी व्यक्त केली आहे.

(माहिती अधिकारी, माहिती जनसंपर्क महासंचलनालय)
मो. ७०२८५८६९१९
कोपरगांव तालुक्यापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेले वारी हे दहा हजार लोकसंख्येचे गाव आहे. २०१८ पर्यंत गावात पाण्याची टंचाई होती. मात्र २०१९ नंतर गावालगतच समृध्दी महामार्गाच्या कामामुळे आजू-बाजूच्या नदी, तलाव, ओढ्यांचा मोठया प्रमाणात गाळ काढण्यात आला. त्यामुळे गावाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. याचाच फायदा घेत गोरख शंकर टेके-पाटील यांनी २० एकर पडीक माळरानाच्या शेतीसाठी शेततळे बांधले. गावातील कृषी सहायक तुषार वसईकर यांनी त्यांना कृषी विभागाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेची माहिती दिली. शेततळ्यासाठी त्यांनी अर्ज केला. सोडतीद्वारे त्यांची शेततळे लाभासाठी निवड झाली. त्यांना कृषी विभागाकडून ३०X३०च्या शेततळ्यासाठी ५० हजार रूपये व अस्तरीकरणासाठी ७५ हजार रूपयांचे अनुदान मिळाले. त्यातून त्यांच्या शेतात पाण्याचा बारमाही साठा शक्य झाला.
आज त्यांच्या २० एकर शेतापैकी १८ एकर शेतामध्ये ऊस पीक बहरून आलं आहे. २०१८ पासून दरवर्षी प्रत्येक एकरामध्ये ६५ टन ऊसाचे उत्पादन ते घेत आहेत. उर्वरित २ एकर क्षेत्रावर मका व कापूस पीकं घेत आहेत. कोपरगांव साखर कारखान्यात टनाला २५०० रूपयांचा भाव ही त्यांना मिळतो. ऊस पीकानं त्यांना जीवनात स्थिरता व आर्थिक स्थैर्य दिले आहे. २०१८ पूर्वी त्यांना काम-धंद्याच्या शोधासाठी स्थलांतर करावे लागले. २००४ ते २००९ मध्ये एका कृषी कंपनीत त्यांनी फिल्ड ऑफीसर म्हणून काम केले. २०१२ ते २०१७ मध्ये एका बांधकाम प्रकल्पात त्यांनी काम केले. आज मात्र गावात राहून ते शेततळ्याच्या मदतीने आधुनिक पध्दतीने समृध्द शेती करत आहेत.
परिसरात एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचा नावलौकीक झाला आहे. शेती मध्ये त्यांनी केलेले वेगवेगळे प्रयोग पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील शेतकरी त्यांच्या शेतावर भेट देत असतात. शेतकऱ्यांना ते कृषी विषयक सल्ला ही नियमितपणे देत असतात. शेतीच्या कामात त्यांना मोठा मुलगा मदत करतो. लहान मुलाने स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी घेतली आहे. तर मुलीचे लग्न झाले असून मुलगी व जावई पुणे येथे संगणक अभियंता आहेत. स्वत: गोरख टेके-पाटील यांचे भूगोल विषयात पदवीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. आज त्यांच्याकडे ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर सह शेती उपयोगी सर्व साधने आहेत. कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करत आधुनिक पध्दतीने शेती करण्यावर त्यांचा भर आहे. शेतात ते सेंद्रीय खतांचा ९५ टक्के वापर करतात. त्यामुळे पीक उत्पादनात भरघोस वाढ झाली आहे.
कमीत कमी पाण्यात ऊस पीक घेता आले पाहिजे. यासाठी ऊसाच्या प्रत्येक पट्टयात सूक्ष्म सिंचनाची व्यवस्था केली आहे. शेतातील सर्व पट्ट्यातील पाणी व्यवस्थापनासाठी एका ठिकाणी नियंत्रक सामग्री बसविली आहे. भविष्यात ऊसापासून इथेनॉल प्रकल्प उभारण्याचा मानस असल्याचे गोरख टेके यांनी सांगितले. सूक्ष्म सिंचन, सेंद्रीय खत व कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करत आधुनिक पध्दतीने शेती केली तर शेती निश्चितच फायदेशीर ठरेल.असे ही श्री.टेके-पाटील यांनी सांगितले.