योगेश सगर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्र येथे दोन दिवसीय मॅसीकॉन- 2023 ही राज्यस्तरीय सायटोलॉजी वैद्यकीय परिषद नुकतीच संपन्न झाली. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, अधिष्ठाता डॉ. विद्या परांजपे, शिक्षणाधिकारी डॉ. आर. डी.दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद संपन्न झाली.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले, तर समारोप मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी उदघाटन सत्रात अधिष्ठाता डॉ. विद्या परांजपे यांनी महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत केले. परिषदेत मुंबई व नागपूर येथील प्रख्यात सायटोलॉजी तज्ञांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले, तर विषय तज्ञांनी विविध परिसंवादमध्ये सहभाग घेतला.
सायटोलॉजी ही पॅथोलॉजी या विषयातील अत्यंत महत्त्वाची शाखा असून शरीरातील विविध व्याधींच्या निदानासाठी ही एक कमी खर्चात होणारी आणि जलद निदान पद्धती आहे, कॅन्सर सारख्या गंभीर आजारांचे प्राथमिक अवस्थेमधील शोध व त्वरित उपचार चालू होण्यासाठी ही अत्यंत उपयुक्त अशी चाचणी असून वैद्यकीय शास्त्रामधील विविध प्रकारच्या आजारांच्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाय यासह इतर विषयांवर या परिषदेत संशोधनात्मक व शास्त्रीय गटचर्चा झाली. परिषदेमध्ये राज्यभरातील 200 प्रतिनिधींनी सहभाग घेतला असल्याची माहिती परिषदेच्या अध्यक्षा व विभाग प्रमुख डॉ. प्रीती बजाज, सचिव डॉ.राजेंद्र चौधरी यांनी दिली आहे.
यावेळी महाराष्ट्र सायटोलॉजी असोसिएशनचे सचिव डॉ. सुधीर संकलेचा यांच्यासह सर्व पदाधिकारी मुंबई, नागपूर, पुणे, नाशिकसह राज्यभरातील पॅथॉलॉजी विषयातील तज्ञांनी या परिषदेत सहभाग नोंदवला.परिषद यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील पॅथॉलॉजी विभागातील शिक्षक, पॅथॉलॉजी विषयातील पदव्युत्तर शाखेतील विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Statewide 200 Doctors Nashik Cytology Conference