मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आगामी गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतिनिमित्त राज्य सरकारने राज्यातील लाखो नागरिकांना मोठी भेट दिली आहे. गुढीपाडवा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. सुमारे १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
राज्य सरकारने दिवाळीतही आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला होता. ‘आनंदाचा शिधा’ या माध्यमातून चार वस्तूंचे १०० रुपयात वाटप केले जाणार आहे. चांगल्या प्रतीचा १ किलो रवा, १ किलो चणा डाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल स्वस्त दरात १०० रुपयांमध्ये सर्वांना मिळणार आहे. राज्यातील पात्र शिधा पत्रिकाधारकांना आगामी काळामध्ये प्राधान्य कुटूंबातील शिधा पत्रिकाधारकांना, अंत्योदय अन्न योजनेतील सुमारे १ कोटी ६३ लाख पात्र लाभार्थींना याचा लाभ मिळणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या निर्णयाद्वारे लाखो नागरिकांचा गुढीपाडवा आणि डॉ. बासाहेब आंबेडकर जयंती उत्सव गोड केला आहे. राज्यातील सर्व रेशनिंग दुकांनावर या चारही जीवनावश्यक वस्तू वितरीत केल्या जाणार आहेत.
गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
याचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता.
अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना १ किलो रवा, १ किलो चनाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील १ महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल.
हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे २१ दिवसांऐवजी १५ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. २०२२ मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत २७९ प्रति संच या दरानुसार ४५५ कोटी ९४ लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी १७ कोटी ६४ लाख अशा ४७३ कोटी ५८ लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.
State Government Big Gift on Gudhipadva and Ambedkar Jayanti