नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपूर्ण भारतात चालवलेल्या मोहिमेत महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) नेपाळ सीमेवरून कार्यरत असलेल्या सुदानी नागरिकांच्या सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने पाटणा, पुणे आणि मुंबई येथे केलेल्या वेगवेगळ्या कारवाई दरम्यान सुमारे ५१ कोटी रुपये (अंदाजे) किमतीचे एकूण १०१.७ किलो तस्करीचे सोने जप्त केले. जप्त केलेले सोने मुख्यतः पेस्ट स्वरूपात असून ते भारत-नेपाळ सीमेवरून पाटण्याला आणले जात होते आणि नंतर रेल्वेने किंवा विमानाने देशाच्या विविध भागांमध्ये आणि मोठ्या प्रमाणावर मुंबईत नेले जात होते.
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्यांनी १९ फेब्रुवारीच्या रात्री उशिरा तीन सुदानी नागरिकांना पाटणा रेल्वे स्थानकावर मुंबईला जाणार्या ट्रेनमध्ये चढताना अडवले. दोन सुदानी नागरिकांकडून ४० पॅकेटमध्ये ३७.१२६ किलो वजनाचे सोने असलेली पेस्ट जप्त करण्यात आली. या नागरिकांनी ही पेस्ट मोठ्या कल्पकतेने त्यांनी घातलेल्या स्लीव्हलेस जॅकेटच्या पोकळीत लपवली होती. यांच्यापैकी तिसरा सुदानी नागरिक सीमावर्ती भागातील तस्करी कारवायांमध्ये समन्वय साधणारा आणि तस्करीच्या सोन्याच्या वाहतुकीची व्यवस्था करणारा हँडलर होता. दोन सुदानी महिला नागरिकांचा दुसरा गट २० फेब्रुवारी रोजी पुण्यात, हैदराबाद ते मुंबई बस प्रवास करताना अडवण्यात आला आणि त्यांच्याकडून त्यांच्या हातातील बॅगमध्ये लपवून ठेवलेले ५.६१५ किलो तस्करीचे सोने जप्त करण्यात आले.
२० फेब्रुवारी रोजी पाटण्याहून मुंबईला जाणाऱ्या दोन सुदानी नागरिकांचा तिसरा गट मुंबई रेल्वे स्थानकावर रोखण्यात आला. दोन सुदानी नागरिकांकडून अशाच पद्धतीने ४० पॅकेटमध्ये लपवून ठेवलेली ३८.७६ किलो वजनाचे सोने असलेली सोन्याची पेस्ट जप्त करण्यात आली.तस्करांनी अथवा वाहकांनी दिलेल्या सूचनेवर तत्परतेने कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्यांनी विविध स्वरुपातील सुमारे २०.२ किलो तस्करी केलेले सोने तसेच तस्करी केलेल्या सोन्याच्या साठवणुकीसाठी वापरले जाणारे ७४ लाख रुपये किमतीचे विदेशी चलन आणि ६३ लाख रुपयांचे भारतीय चलन मुंबईतील वेगवेगळ्या परिसरातून जप्त केले. या कारवाईत तिघांना अटक देखील करण्यात आली.
Golden Don Operation by DRI Crore Gold Seized