इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून चक्क रिझर्व्ह बँकेची फसवणूक करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. आग्रा येथील छीपीटोला येथील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेने रिझर्व्ह बँकेकडे पैसे पाठवले होते. त्यात १००च्या सहा नोटा बनावट निघाल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया क्लेम सेक्शन, कानपूरच्या वतीने रकाबगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बँकेतील अज्ञात कर्मचाऱ्यांना आरोपी करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे या प्रकारात स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही बनावट नोटा ओळखू आल्या नाहीत. तसेच, नोटा तपासण्यासाठी मशिन्सही बसविण्यात आल्या आहेत. असे असतानाही रिझर्व्ह बँकेकडे बनावट नोटा गेल्या कशा असा प्रश्न उपस्थित होत आहे. अखेर रिझर्व्ह बँकेत तपासादरम्यान बनावट नोटा पकडण्यात आल्या आहेत.
इतर करन्सी बँकांच्या करन्सी चेस्ट शाखांमधून कानपूर रिझर्व्ह बँकेत नोटा पोहोचतात. रिझर्व्ह बँकेच्या क्लेम सेक्शन आणि इश्यू डिपार्टमेंटच्या मॅनेजरने याप्रकरणी रकाबगंज पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, विविध करन्सी चेस्टमधून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा येतात. एप्रिल महिन्यात आग्रा स्टेट बँकेच्या करन्सी चेस्टमधून पाठवलेल्या १०० रुपयांच्या सहा नोटा बनावट असल्याचे समोर आले आहे.
बँकींग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते या प्रकरणात मोठा निष्काळजीपणा झाला आहे. बनावट नोटा शोधण्यासाठी बँकांकडे आधीच भरपूर संसाधने आहेत. यंत्रे बसवली आहेत, त्यामुळे बनावट नोटा लगेच पकडल्या जातात. असे असूनही कर्मचाऱ्यांना नोटा ओळखता आल्या नाहीत. याचे एक कारण म्हणजे केवळ २ हजार आणि ५०० च्या नोटांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. १०० आणि ५० सारख्या छोट्या नोटा जमा करताना कर्मचारी फारसे लक्ष देत नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
State Bank of India SBI cheating RBI