नवी दिल्ली – अमेरिकेतील उद्योगपती अॅलन मस्क यांच्या स्पेसएक्स या एअरोस्पेस कंपनीने चार सामान्य नागरिकांना अंतराळात पाठवून इतिहास रचला आहे. स्पेसएक्स कंपनीने इंस्पिरेशन ४ या मोहिमेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या क्रूला अंतराळात पाठविण्याचा विक्रम नोंदविला आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील कॅनेडी स्पेस सेंटर येथून आज पहाटे साडेपाच वाजता (भारतीय वेळेनुसार) स्पेसएक्सचे क्रू ड्रॅगन कॅप्सूल फाल्कन-९ रॉकेट चार सामान्य नागरिकांना घेऊन अंतराळात रवाना झाले. या मोहिमेत चार हौशी अंतराळ प्रवासी पृथ्वीपासून ३५७ मिल (५७५ किमी) च्या उंचीवर प्रवास करत आहेत. ते या खासगी अंतराळयानात तीन दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहतील. म्हणजेच हे अंतराळयान पृथ्वीला प्रदक्षिणा मारणार आहे. एकही व्यावसायिक अंतराळवीर नाही हे या मोहिमेचे वैशिष्ट्य आहे. या मोहिमेला इंस्पिरेशन ४ असे नाव देण्यात आले आहे. २००९ नंतर प्रथमच माणूस इतक्या उंचीवर पोहोचला आहे.
स्पेसएक्सची ही मोहीम फाल्कन ९ रॉकेटद्वारे संचलित करण्यात आली. अमेरिकेतील उद्योगपती जॅरेड आयजॅकमॅन यांनी मोहीम राबविली आहे. त्यांनी स्वतः खर्च करून ही मोहीम भाड्याने घेतली आणि तीन अपरिचित व्यक्तींना त्यांच्यासोबत येण्याचे निमंत्रण दिले. त्यांच्या सहप्रवाशांना निवडण्यासाठी एक वेगळीच निवडप्रक्रिया राबविण्यात आली.
कोण आहे आयजॅकमॅन
अंतराळ क्षेत्रात आवड असणा-या जॅरेड आयजॅकमॅन हे शिफ्ट ४ पेमेंट्स नावाच्या कंपनीचे संस्थापक आहेत. तसेच या मोहिमेचे कमांडर आहेत. आयजॅकमॅन यांची कंपनी दुकाने आणि रेस्टॉरंटना बँककार्ड व्यवहार पूर्ण करण्याची सेवा देते. वयाच्या १६ वर्षी त्यांनी आपल्या घराच्या तळघरात ही कंपनी सुरू केली होती. त्यांना विमानाचे सारथ्य करण्यास आवडते. एका लहान विमानातून संपूर्ण जगाला प्रदक्षिणा मारण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.