इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केरळ आणि तमिळनाडूच्या आयकर विभागाने काही प्रसिद्ध मल्याळम चित्रपट निर्मात्यांच्या आणि अभिनेत्यांच्या घरावर छापे टाकले आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून एर्नाकुलम जिल्ह्यात ही कारवाई सुरू आहे. विशेष म्हणजे, या छापेमारीत अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांकडून कसलीही मदत घेतलेली नाही. या छाप्यांमुळे आता खळबळ उडाली आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील या निर्मिती कंपन्यांनी करचुकवेगिरी केली का, याचा तपास आयकर विभागाचे अधिकारी करत आहेत.
प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता पृथ्वीराज सुकुमारन याच्या घरावर सुरुवातीला छापा टाकण्यात आला. त्यानंतर निर्माते अँटनी पेरुंबवुर, अँटो जोसेफ आणि लिस्टिन स्टीफन यांचेही घर तसेच कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले. छापेमारीची ही कारवाई सकाळीच सुरू झाली आणि संध्याकाळपर्यंत ती सुरूच होती. या संपूर्ण घटनेबद्दल कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
मोहनलाल यांच्या बहुतांश चित्रपटांची निर्मिती निर्माते अँटनी पेरुंबवुर यांनी केली होती. त्यामुळे त्यांच्या यशात पेरुंबवुर यांचा मोठा वाटा आहे. तर जोसेफ यांचं सुपरस्टार ममूटी यांच्यासोबत जवळचं नातं आहे. ‘पुष्पा’ या सुपरहिट चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या मैत्री कंपनीच्या मालकासह त्यांच्याशी संबंधित इतरांवरही आयटी विभागाने छापे टाकले आहेत. यलमंचिली रविशंकर, नवीन अर्नेनी आणि चेरूकुरू यांच्या कार्यालयांसह पंधरा ठिकाणी ही मोठी कारवाई झाली आहे. मैत्री या निर्मिती कंपनीने पुष्पा, श्रीमंतुडू यांसारख्या तेलुगू चित्रपटांची निर्मिती केली. पृथ्वीराज सुकुमारन, मोहनलाल, ममूटी ही दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील खूप मोठी नावं आहेत. त्यामुळे या कारवाईची विशेष चर्चा आहे.
South Film Industry Producer Income Tax Raid
Entertainment