मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – बॉलीवूड म्हणजेच हिंदी चित्रपट सृष्टी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. परंतु त्याच बरोबर साऊथमधील चित्रपट सृष्टीची देखील सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कारण सध्या साऊथ मधील चित्रपट जबरदस्त यश प्राप्त करत आहेत. त्यामुळे सध्या भारतीय चित्रपटसृष्टीत बॉलिवूड विरुद्ध साऊथ इंडस्ट्री अशी लढाई पाहायला मिळत आहे. या वादावर अनेक सेलिब्रिटी बोलले पण साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार महेश बाबू यांच्या वक्तव्याने वादात आणखीनच भर पडली आहे. या अभिनेत्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. इतकेच नाही तर बॉलीवूडला मी परवडणार नाही, तसेच हिंदी सिनेमात रसही नाही असेही त्याने म्हटले आहे.
महेश बाबू हा साऊथ इंडस्ट्रीतील टॉप कलाकारांपैकी एक आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत तो अनेक बॉलिवूड कलाकारांशी स्पर्धा करतो. इतकेच नाही तर कमाईच्या बाबतीतही तो बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही. या अभिनेत्याच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून सर्वांना आश्चर्य वाटते.
महेश बाबू हा साऊथ इंडस्ट्रीचे बादशाह आहे. त्याची फॅन फॉलोइंग जोरदार आहे. चाहते त्यांच्या चित्रपटांची मनापासून वाट पाहतात आणि त्यांचे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर धमाल करतात. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सर्वाधिक फी घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे. महेश बाबू एका चित्रपटासाठी ५५ कोटी रुपये घेत असे. पण आता अभिनेत्याने त्याची फी वाढवली आहे. आता तो एका चित्रपटासाठी ८० कोटी रुपये घेत आहे.
महेश बाबू यांची संपत्ती करोडोंमध्ये आहे. अहवालानुसार, अभिनेत्याची एकूण संपत्ती ३२दशलक्ष डॉलर्स आहे. भारतीय चलनात पाहिले तर महेश बाबू यांची एकूण संपत्ती २४४ कोटी रुपये आहे. अभिनेत्याची बहुतेक कमाई चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून येते.
अन्य सेलिब्रिटींप्रमाणे महेश बाबूलाही महागड्या वाहनांचा शौक आहे. अभिनेत्याकडे एकापेक्षा एक महागडी वाहने आहेत. महेश बाबू यांच्याकडे टोयोटा लँड क्रूझर V8, लँड रोव्हर रेंज रोव्हर वोग, BMW 730 LD, Mercedes-Benz GLS 450, Audi A8L सारखी अनेक वाहने आहेत. याशिवाय महेश बाबूकडे स्वतःची व्हॅनिटी व्हॅन आहे जी पंचतारांकित हॉटेलपेक्षा कमी नाही. कारण या व्हॅनिटी व्हॅन लक्झरी सुविधांनी सुसज्ज आहेत. या व्हॅनिटीची किंमत 6 कोटी रुपये असल्याचा दावा केला जात आहे.
महेश बाबू यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले होते. त्यांनी इंडस्ट्रीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. महेश बाबू अखेरचे सरिलेरू नीकेव्वरुमध्ये दिसले होते. त्याचवेळी आता त्याचा ‘सरकार वारी पाता’ हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट दि. १२ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची कशी पसंती मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.