ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोनोग्राफी हा गर्भधारणा व प्रसुती प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळेच गर्भाशयातील बाळाची स्थिती नेमकी काय आहे हे कळू शकते. मात्र सोनोग्राफी’च्या चुकीच्या अहवालामुळे एका गर्भवतीचा मृत्यू झाला होता. या संदर्भात मयत महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित डॉक्टरवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपल्या घरात बाळ येणार किंवा त्याचा जन्म होणार ही कोणत्याही परिवारासाठी आनंदाची गोष्ट असते. गर्भधारणा हा शब्द ऐकला म्हणजे लहान बाळाच्या पावलांची चाहूल लागते. तसेच तेव्हा काही वैद्यकीय चाचण्यांची आवश्यकता सोनोग्राफी हा गर्भधारणा व प्रसुती प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग आहे. मात्र, या सोनोग्राफीबद्दल गर्भवती महिला आणि तिच्या परिवारातील सदस्यांच्या मनात भितीसह अनेक प्रश्न असतात. परंतु आजच्या काळात प्रत्येक गर्भवती महिलेला सोनोग्राफीसाठी डॉक्टरांकडे जावेच लागते.
त्याप्रमाणे कल्याण शहरामधील अश्विनी साळुंखे ही गर्भवती महिला वैष्णवी हॉस्पीटल या खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. तिच्यावर उपचार करण्यासाठी वैष्णवी हॉस्पीटलचे डॉ. अश्विन कक्कर यांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार डॉ. अमोल वाणाईत यांच्या केंद्रात ‘सोनोग्राफी’ करण्यात आली होती. त्यानंतर मात्र गर्भवतीच्या मृत्यूची घटना गेल्या वर्षी घडली होती.
खरे म्हणजे सोनोग्राफीद्वारे सर्वप्रथम डॉक्टर हे बघतात की, गर्भधारणा नेमकी गर्भाशयातच झाली आहे ना! जर गर्भधारणा गर्भाशयाच्या आत न होता, अन्यत्र कुठे झाली असेल तर ती गर्भधारणा ठेवता येऊ शकत नाही. बाळ एक आहे की, जुळे वा तिळे आहे, हे आपण या स्कॅनद्वारे बघीतले जाते, त्यात हृदयाचे ठोके आहेत का? रक्तपिशवीत कुठे रक्ताची गाठ तर नाही ना? हे या स्कॅनद्वारे तपासले जाते.
दुसऱ्या सोनोग्राफीला अॅन्टीस्कॅन असे म्हणतात. या सोनोग्राफीत तीन बाबी प्रामुख्याने तपासल्या जातात. नेजल बोन अर्थात नाकाचे हाड, दुसरे म्हणजे मानेच्या मागे असलेल्या पाण्याचा थर व तिसरी बाब म्हणजे रक्तवाहिनीतील प्रवाह होय. परंतु सदर महिलेच्या गर्भाशयात असा कोणताही दोष दाखविण्यात आला नव्हता, तरी त्या महिलेचा मृत्यू झाल्याने सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, विशेष म्हणजे ही घटना मागील वर्षी घडली होती, परंतु पोलीस तपासानंतर आता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
दरम्यान, अशाच प्रकारची एक घटना मराठवाड्यात देखील घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील एका गर्भवती महिलेची चुकीची सोनोग्राफी केल्याने गर्भवती महिलेसह तिच्या बाळाचा गर्भातच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. याप्रकरणी चौकशी समितीच्या अहवालानंतर धर्माबाद पोलिसांनी दोषी आढळलेल्या सोनोग्राफी सेंटरच्या डॉक्टरवर गुन्हा दाखल केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
Sonography False Report Doctor Booked FIR Women Death