सिन्नर – येथील सरदवाडी रोडलगतच्या वृंदावनगरमधील आर्ट कॉर्नर इमारतीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि. १३) दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास घडली. याबाबत राहुल रमेश पावसे (३१) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पावसे कुटुंबीय कामानिमित्त घराबाहेर गेलेले असतानाच, चोरट्यांनी फ्लॅटचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. या घरफोडीत अडीच तोळे सोन्याचे गंठण (३२ हजार ५०० रुपये), दीड तोळे वजनाचे सोन्याचे गंठण (१९ हजार ५०० ) व तीन हजार रुपयांची रोख रक्कम असा ५५ हजारांचा ऐवज चोरून नेला. दुपारी पावसे कुटुंबीय घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.