सिन्नर– मित्राची गोष्ट ही बालकांचं भावविश्व उलगडणारी कादंबरी आहे. मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी उत्तम बालसाहित्याची निर्मिती होणे आवश्यक असते, ती बाब ही किशोर कादंबरी पूर्ण करते. इतर अनेक भाषांमध्ये या कादंबरीचे भाषांतर होणे आवश्यक आहे. भाषांच्या भिंती ओलांडून बाल साहित्य जगभर पोहोचावे असे मत डॉ. संतोष खेडलेकर यांनी व्यक्त केले.
येथील साहित्यिक किरण भावसार यांच्या मित्राची गोष्ट या किशोर कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्हान्स्ड एन्झाईम्सचे डॉ. अभिजित राठी होते. कामगार शक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल सरवार, विश्वकोश निर्मिती मंडळाच्या सदस्या मनीषा उगले, मसापचे कार्याध्यक्ष रवींद्र कांगणे व्यासपीठावर उपस्थित होते. कामगार शक्ती फाउंडेशनच्या कार्यालयात झालेल्या छोटेखानी प्रकाशन सोहळ्यात, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल डॉ. संतोष खेडलेकर आणि राज्याच्या विश्वकोश निर्मिती मंडळावर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल मनीषा उगले यांचा सत्कार करण्यात आला.
मनीषा उगले यांनी कादंबरीची वैशिष्ट्ये उलगडताना ती सिन्नरची प्रादेशिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये जगासमोर मांडणारा महत्त्वाचा दस्तावेज असल्याचे सांगितले. बाल साहित्याकडे गांभीर्याने बघण्याची गरज असण्याच्या काळात उपेक्षित विद्यार्थ्यांचे भावविश्व घडवणारी ही कादंबरी महत्त्वाची ठरते असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक मसापचे कार्याध्यक्ष रवींद्र कांगणे यांनी केले. दिग्विजय वाचनालयाचे अध्यक्ष रवींद्र खुळे यांनी कादंबरीतील काही भागांचे जाहीर अभिवाचन केले. कादंबरीतील महत्वाची पात्रे अंशतः ज्यांच्या जीवनावर बेतलेली आहेत अशा नवनाथ खुळे, निवृत्त सैनिक गोरख चव्हाणके आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. गुणवंत कामगार गणेश तांबोळी यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
पुण्याच्या चपराक प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या या कादंबरीला वाचकांची वाढती मागणी असल्याचे आढळून आले. डॉ. संतोष खेडलेकर व मनीषा उगले यांनी केवळ प्रकाशन केले नाही तर प्रकाशनानंतर लगेच आपापली एकेक प्रत रोख पैसे देऊन विकत घेतली. आणि उपस्थितांनाही पुस्तक विकत घेण्याचे आवाहन केले.
राजेंद्र भावसार यांनी स्वागत केले. आभार कामगार शक्ती फाऊंडेशनचे रवींद्र गिरी यांनी मानले. यावेळी सचिन कोकाटे, राजाराम खुळे, पांडू वैद्य, सजन सांगळे, सोमनाथ हगवणे, डॉ. श्यामसुंदर झळके, संदीप भोर, दीपक खुळे, दर्शन हिरे, नारायण भावसार, अविनाश आव्हाड, अभिजीत खेडलेकर आदी उपस्थित होते.